नवी दिल्ली – शीना बोरा हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला. इंद्राणी मुखर्जीने परदेशात जाण्यास परवानगी मागणारी याचिका केली होती ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि कनिष्ठ न्यायालयाला याप्रकरणाची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.याप्रकरणात ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती.अनेक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मे २०२२ मध्ये त्यांना जामीन मंजूर केला होता. १९ जुलै २०२४ रोजी विशेष न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीची स्पेन आणि ब्रिटनला १० दिवस जाण्यास परवानगी दिली होती.त्यानंतर सीबीआयने विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.उच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला.या आदेशाला इंद्राणीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज तिची याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने परदेशात जाण्यास नकार दिली.
इंद्राणीला परदेशात जाण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
