अवकाळी पावसामुळेउत्तर प्रदेशात १३ बळी

लखनऊ – उत्तर प्रदेशात तीव्र उन्हाळा सुरु असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे १३ जणांना जीव गमवावा लागला आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यामुळे अचानक हवामान बदलून जनजीवन विस्कळीत झाले.अयोध्येत ६, बाराबंकीमध्ये ५ आणि अमेठी आणि बस्तीमध्ये प्रत्येकी १ जण वीज कोसळून आणि वादळामुळे मृत्युमुखी पडला. उत्तर प्रदेशातील ३७ जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला. हिमाचल प्रदेशात दोन तर पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. भारतीय हवामान खात्याने २४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात अचानक आलेल्या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. चंबा, कांगडा, कुल्लू, मंडी, शिमला आणि लाहौल-स्पिती. भागात वादळाचा इशारा देण्यात आला असून यामुळे सफरचंदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर राजस्थानातील ९ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आणि धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे.