नवी दिल्ली- अमेरिकेतून हद्दपार केलेल्या 104 भारतीयांना घेऊन अमेरिकन लष्कराचे विमान काल पंजाबमधील अमृतसर विमानतळावर उतरले. त्यावेळी एक धक्कादायक बाब उघड झाली. या स्थलांतरितांच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या. तर पायांना साखळ्या बांधण्यात आल्या होत्या. अमेरिकन सरकारने भारतीय स्थलांतरितांना अशी कैद्यांप्रमाणे वागणूक दिल्याचे पाहून संताप व्यक्त होत आहे. हा मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करत विरोधकांनी आज भारत सरकारने याबद्दल अमेरिकेचा निषेध का केला नाही, असा प्रश्न सरकारला विचारला आहे.
यूएस बॉर्डर पॅट्रोल चीफ मायकेल बँक यांनी त्यांच्या एक्स हँडलवर भारतात परत पाठवण्यात आलेल्या स्थलांतरितांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीयांच्या हाताला आणि पायाला बेड्या स्पष्टपणे दिसत आहेत. या स्थलांतरितांची हाता-पायात बेड्या-साखळदंड असलेली छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत. ती पाहून संतापाची लाट उमटत आहे. या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक होत संसदेत केंद्र सरकारला जाब विचारला. सकाळी संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी या मुद्यावर चर्चेची मागणी केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘सरकारला लाज वाटली पाहिजे’अशा घोषणा दिल्या. काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यावर चर्चा करण्यासाठी स्थगन सूचना दिली होती. टागोर म्हणाले की, अमेरिकेतून 100 हून अधिक भारतीयांना बाहेर काढण्यात आल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. यावर सरकार गप्प का आहे? भारताने या अमानवी वर्तनाचा निषेध का केला नाही? यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सरकारला तुमच्या चिंतेची जाणीव आहे. हा परराष्ट्र धोरणाचा विषय आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाजही काही काळापुरते तहकूब करण्यात आले. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या बाहेर आंदोलन केले.
दुपारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत भारतीय स्थलांतरितांना माघारी पाठवल्याच्या मुद्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, एखाद्या देशाचे नागरिक परदेशात अवैधपणे राहत असतील, तर अशा प्रत्येक देशाने त्यांच्या नागरिकांना परत देशात घ्यायलाच पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य आहे. ही कारवाई अमेरिकेच्या नियमांनुसार करण्यात आली आहे. अशी कारवाई यापूर्वीही करण्यात आली आहे. ही काही नवीन प्रक्रिया नाही.
अमेरिकेहून भारतात धाडलेल्यांनी आपला प्रवासाचा भयंकर अनुभव सांगितला. पंजाबच्या होशियारपूर येथील तरुणाने सांगितले की, विमानात 40 तासाच्या प्रवासात आमच्या हातापायाला बेड्या होत्या. जेवताना आणि शौचालयाला जातानाही या बेड्या काढल्या नाहीत. मी 22 जानेवारीला दक्षिण अमेरिकेत मेक्सिको येथून जंगल वाटेने अमेरिकेत जाण्यास निघालो. एक एजंट आम्हाला अमेरिकेत नेऊन सोडणार होता. हा प्रवास करताना अनेक जणांना सोसले नाही आणि त्यांचे प्राण गेले. काही जण वाटेतच कोसळले. त्यांना तिथेच सोडून देण्यात आले. त्यांच्या मदतीला थांबण्यास एजंट तयार नव्हता. मोठ्या आवाजात बोलले तर गोळी मारू, असेही एजंट धमकाविले होते. जंगलातून वाट काढत आम्ही कसेबसे अमेरिकेला पोहोचलो. तेथेही पटकन नोकरी मिळाली नाही. अनेक दिवस आम्ही उपाशीच होतो. पोट भरण्यासाठी या हालअपेष्टा सहन करीत होतो. त्यानंतर आम्हाला पकडून भारतात परत पाठविण्यात आले.
पंजाबच्या होशियारपूरमधील ताहली गावात राहणारा हरविंदर सिंगही अमेरिकेने भारतात परत पाठवलेल्या विमानातून परतला. 8 महिन्यांपूर्वी एजंटला 42 लाख देऊन तो अमेरिकेत गेला होता. तो म्हणाला की, या प्रवासाचा अनुभव हा नरकाहून भयंकर होता. त्यांना वारंवार बेड्या काढण्यास सांगूनही लक्ष दिले नाही. हा प्रवास फक्त शारिरीकच नाही, तर मानसिकदृष्ट्याही प्रचंड थकवणारा होता. 40 तासांत आम्हाला व्यवस्थित खायलाही मिळाले नाही. एका दयाळू विमान कर्मचाऱ्याने आम्हाला काही फळे खायला दिली.
अमेरिकेतून आलेल्यांच्या हातापायात बेड्यांमुळे संताप
