दोडामार्ग – तालुक्यातील तिलारी खोर्यात हत्तींचा उच्छाद होत असल्याने शेतकर्यांच्या बागायती शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्नाटकातील खानापूरच्या धर्तीवर या भागात हत्ती पकड मोहीम राबविण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच १० फेब्रुवारी रोजी साखळी उपोषण करणार आहेत. मात्र आता याच प्रश्नावर आमदार दीपक केसरकर हे येत्या ८ दिवसांत वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी विशेष बैठक घेणार आहेत.
आमदार दीपक केसरकर हे काल दोडामार्ग दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी तालुक्यातील हत्तीच्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. यावेळी आमदार केसरकर म्हणाले की, हत्तीच्या प्रश्नाबाबत येत्या आठ दिवसांत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक याच्याशी मुंबईत विशेष बैठक घेणार असून आणि या बैठकीत याबाबतचे धोरण ठरवणार आहोत. केसरकरांच्या या भूमिकेमुळे तिलारी खोर्यातील त्रस्त शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता या बैठकीत वनमंत्री काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तिलारी खोर्यातील केर, मोर्ले , बाबरवाडी या भागात हत्तींचा वावर वाढला आहे. या जंगली हत्तींमुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या भागात हत्ती पकड मोहीम राबवण्याची मागणी येथील शेतकरी करत आहेत.