हत्या आणि खंडणीत मी नाही मला सोडा! कराडचा अर्ज

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आरोपी वाल्मिक कराडने आज न्यायालयात अर्ज केला की, हत्या आणि खंडणी दोन्ही गुन्ह्यांशी माझा काहीही संबंध नाही. माझ्याविरूध्द काहीही पुरावा नाही. मी निर्दोष आहे. मला या खटल्यातून वगळा. पुढील सुनावणीत यावर युक्तिवाद होईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज दुसर्‍यांदा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम त्याचबरोबर विशेष सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे तर आरोपीचे वकील विकास खाडे न्यायालयात हजर होते. वाल्मिक कराडने न्यायालयाकडे खटल्याशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली होती. ती सगळी कागदपत्रे सीआयडीमार्फत न्यायालयात सादर करण्यात आली. काही सीलबंद कागदपत्रे आहेत ती कोर्टाने उघडल्यावर कराडच्या वकिलांना देण्यात येतील. विशेष म्हणजे देशमुख यांना मारहाण करतानाचा आरोपींनी काढलेला व्हिडिओ आज कोर्टात सादर करण्यात आला. हा व्हिडिओ समाजमाध्यमावर येऊ नये, हा व्हिडिओ विचलित करू शकतो अशी विनंती उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे.
या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा सध्या लातूर कारागृहात आहे . त्याला बीडच्या कारागृहात हलवण्यात यावे यासाठी विष्णू चाटेचे वकील राहुल मुंडे यांनी अर्ज दाखल केला आहे. आजच्या सुनावणीनंतर उज्ज्वल निकम म्हणाले की वाल्मिक कराडची स्थावर व जंगम मिळकत जप्त करावी यासाठी आम्ही न्यायालयात अर्ज दिला आहे. त्यावर वाल्मिकतर्फे कोणताही खुलासा दाखल करण्यात आलेला नाही.
सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या संपत्तीचा तपास सुरू आहे. सीआयडीकडून इतर आरोपींची चल आणि अचल संपत्तीचा तपास केला जात आहे. तपास झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.