New Aadhaar App | केंद्र सरकारने नागरिकांची ओळख पडताळणी आणखी सुलभ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी नवीन आधार मोबाईल ॲप (New Aadhaar App) अधिकृतपणे लाँच केले.
UIDAI (Unique Identification Authority of India) च्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या डिजिटल ॲपमध्ये फेस आयडी (Face ID) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence – AI) चा वापर करून नागरिकांना सुरक्षित, डिजिटल आधार पडताळणीची सुविधा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती ‘X’ या सोशल प्लॅटफॉर्मवरून शेअर करत सांगितले की, “आधार पडताळणी आता UPI पेमेंट इतकी सहज आणि सोपी होणार आहे.” नव्या ॲपमध्ये QR कोड स्कॅनिंग, रिअल-टाइम फेस व्हेरिफिकेशन, आणि युजर कन्सेंटवर आधारित डेटा शेअरिंग यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
आधार कार्ड आता मोबाईलमध्ये
या ॲपच्या मदतीने नागरिकांना आता हॉटेल, दुकान किंवा प्रवासादरम्यान आधार कार्डाची फिजिकल प्रत किंवा झेरॉक्स सोबत नेण्याची गरज भासणार नाही. QR कोडद्वारे त्वरित पडताळणी करता येणार असून, मोबाईलमधूनच आधार ओळख पुरवता येईल.
वैष्णव यांनी स्पष्ट केले की, हे ॲप 100% डिजिटल, सुरक्षित आणि पारदर्शक असून वापरकर्त्याच्या संमतीशिवाय कोणतीही माहिती शेअर केली जाणार नाही. यामुळे व्यक्तीला आपल्या वैयक्तिक माहितीवर पूर्ण नियंत्रण मिळेल.
सध्या हे ॲप बीटा चाचणीच्या टप्प्यात असून लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल. याच्या वापराने नागरिकांना अधिक वेगाने आणि अचूक आधार पडताळणी करता येणार आहे.UPI पेमेंटप्रमाणेच लवकरच देशभरातील पडताळणी केंद्रांवर आधार QR कोड दिसतील. यामुळे नागरिक मोबाईलमधील आधार ॲपद्वारे QR स्कॅन करून क्षणात ओळख सिद्ध करू शकतील.