Air India Pee-Gate: एअर इंडिया विमानात पुन्हा लघुशंका प्रकरण, व्यक्तीने सहप्रवाशावर केली लघवी

Air India Pee Incident

Air India Pee Incident | दिल्लीहून बँकॉककडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) AI-2336 या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर कथितपणे लघुशंका (Pee Incident) केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकारानंतर एअर इंडियाने अधिकृत निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली. एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, फ्लाइटमध्ये असभ्य वर्तनाची तक्रार कर्मचाऱ्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदवली आणि सर्व प्रक्रिया नियमांनुसार पार पाडण्यात आली.

“9 एप्रिल 2025 रोजी AI-2336 फ्लाइटमध्ये कर्मचाऱ्यांनी एका प्रवाशाच्या गैरवर्तनाची तक्रार नोंदवली आहे. त्यांनी सर्व नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण केली असून, अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे,” असे एअर इंडियाने निवेदनात म्हटले.

एअर इंडियाने सांगितले की, आरोपी प्रवाशाला तोंडी समज देण्यात आली, तर पीडित प्रवासी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत (Multinational Company) कार्यरत असल्याचे सांगितले जाते. कर्मचाऱ्यांनी त्यांना बँकॉक विमानतळावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यासाठी मदतीची तयारी दर्शवली होती, पण त्यांनी त्यावेळी तक्रार नोंदवण्यास नकार दिला.

ही घटना गंभीर मानून कंपनीने स्वतंत्र स्थायी समितीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला असून, गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाविरोधात कोणती कारवाई करायची हे समिती ठरवेल. एअर इंडिया नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) ठरवलेल्या मानक संचालन प्रक्रियेचे (SOP) पालन करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शंकर मिश्रा प्रकरणाची आठवण ताजी

या प्रकारामुळे 2022 मधील शंकर मिश्रा (Shankar Mishra) प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. त्या वेळी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये मिश्रा यांनी एका वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याचा आरोप झाला होता. मिश्रा हे वेल्स फर्गो (Wells Fargo) या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेचे भारतातील उपाध्यक्ष होते.

जानेवारी 2023 मध्ये दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर लैंगिक छळ आणि अश्लील कृत्यांचे आरोप दाखल केले होते. त्यानंतर एअर इंडिया कंपनीने त्यांच्यावर 30 दिवसांची विमानप्रवास बंदी लागू केली होती.