US-China Trade War | अमेरिका (USA) आणि चीन (China) यांच्यातील व्यापारी संघर्षाला आता अधिक तीव्र वळण मिळालं आहे. ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाने चीनी वस्तूंवर 104 टक्के आयात कर लावल्याच्या पार्श्वभूमीवर, बीजिंग सरकारने 10 एप्रिलपासून अमेरिकन वस्तूंवर थेट 84 टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे.
याआधी चीनने 34 टक्के शुल्क लावले होते. ही वाढ म्हणजे अमेरिकेच्या व्यापार धोरणांना दिलेले थेट प्रत्युत्तरच आहे, असं मत आंतरराष्ट्रीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.
चीनच्या अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं की हे अतिरिक्त शुल्क तातडीने लागू होणार असून, अमेरिका जेवढा दबाव वाढवेल, तेवढं चीनकडून प्रत्युत्तर अधिक तीव्र होईल. याचवेळी चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेतील 12 कंपन्यांना निर्यात नियंत्रण यादीत तर 6 कंपन्यांना “अविश्वसनीय संस्था” म्हणून घोषित केलं आहे. या घोषणेनंतर अमेरिकेतील शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.
ट्रम्प प्रशासनाने 9 एप्रिलपासून चीनवरील 104 टक्के कर लागू केला होता. या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी चीनकडून उत्तर दिलं गेलं. यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे कोषागार सचिव स्कॉट बेसेन्ट (Scott Bessent) यांनी चीनला संवादाचे आवाहन करत ही कृती दुर्दैवी असल्याचे म्हटले.
ट्रम्प यांनी यापूर्वी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल नेटवर्कवर लिहिले होते की, “चीनने मोठी चूक केली आहे. ते घाबरलेत. त्यांनी असं काही केलंय जे त्यांना परवडणार नाही.” ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, अमेरिका त्यांच्या शुल्क धोरणावर ठाम राहील.
दरम्यान, चीनच्या पंतप्रधान ली कियांग (Li Qiang) यांनीही सांगितलं की, त्यांच्या देशाकडे आर्थिक धक्क्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक आणि आर्थिक साधनं आहेत.
चीन सरकारने याचवेळी दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवरही निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत. हे खनिज संगणक चिप्स, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या आणि अन्य उच्च-तंत्रज्ञान उत्पादनांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे अमेरिकेच्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रावर या निर्बंधांचा प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे.