अंदमानच्या सेंटिनल बेटावर जाण्याचा हट्ट पडला महागात, अमेरिकन यूट्यूबरला अटक; प्रकरण काय? जाणून घ्या

North Sentinel island | भारतीय अधिकाऱ्यांनी उत्तर सेंटिनल बेटावर बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षीय अमेरिकन यूट्यूबरला अटक केली आहे. मायखायलो व्हिक्टोरोविच पॉल्याकोव्ह (Mykhailo Viktorovych Polyakov) असे या युट्यूबरचे नाव आहे. त्याने सेंटिनलीज (Sentinelese) जमातीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे, त्याने भेटवस्तू म्हणून डायट कोकचे (Diet Coke) कॅन आणि नारळ सोडले होते.

पॉल्याकोव्हला 31 मार्च रोजी अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने अंदमान-निकोबार (Andaman and Nicobar Islands) बेटसमूहातील उत्तर सेंटिनल बेटाच्या (North Sentinel Island) 5 किलोमीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी प्रवेश केला होता. त्याचा उद्देश या एकांतप्रिय जमातीशी थेट संपर्क साधणे हा होता. हे बेट भारतीय कायद्यानुसार पूर्णतः बंद क्षेत्र म्हणून घोषित आहे.

स्थानिक न्यायालयाने पॉल्याकोव्हला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्याला 17 एप्रिल रोजी पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याच्यावर भारतीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये 5 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. याबाबत अमेरिकन दूतावासालाही माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉल्याकोव्हने त्याच्या मिशनपूर्वी समुद्राची स्थिती, भरती-ओहोटी, बेटाचा भूगोल यांचा अभ्यास केला होता. त्याने GPS आणि दुर्बिणीचा वापर करत बेटाचे निरीक्षण केले आणि तटावर उतरल्यानंतर शिट्टी वाजवून जमातीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्याने डायट कोक आणि नारळ ठेवले, व्हिडिओ शूट केला आणि परत जाण्यापूर्वी वाळूचे नमुने गोळा केले.

परतताना स्थानिक मच्छीमारांच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर पोर्ट ब्लेअर येथे त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासणीतून समोर आले की, पॉल्याकोव्हने ऑक्टोबर आणि जानेवारीमध्येही अशाच प्रकारे बेटावर जाण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तर त्याने फुगवलेली कयाक नाव वापरून समुद्र पार करण्याचा प्रयत्न केला होता.

जमात एकांतप्रिय, बाहेरील लोकांपासून दूर

अंदमान बेटसमूह भारताच्या मुख्य भूभागापासून सुमारे 1,207 किलोमीटर अंतरावर आहे. उत्तर सेंटिनल बेटावरील जमात हजारो वर्षांपासून इतर जगापासून वेगळी राहिली आहे. येथील रहिवासी भाले, धनुष्य-बाण वापरून शिकार करतात आणि कोणताही बाहेरील हस्तक्षेप नाकारतात. सरकारकडून या जमातीला संरक्षण देण्यात आले आहे. याआधी 2018 मध्ये एका अमेरिकन धर्मप्रसारकाला जमातीने ठार मारले होते, तर 2006 मध्ये दोन मच्छीमारांचा देखील जमातीने जीव घेतला होता.