रक्तस्त्राव होत असताना साडेपाच तास उपचार नाकारले तरीही दीनानाथ रुग्णालयावर हत्येचा गुन्हा नाही?

मुंबई- दुर्दैवी मृत्यू झालेली तनिषा भिसे हिला पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयाने अतिशय क्रूरपणाची वागणूक दिली. तिला शस्त्रक्रियेसाठी पूर्ण तयार केले, पण 10 लाख रुपयांचे डिपॉझिट मिळाले नाही म्हणून तिच्यावर साडेपाच तास उपचार केले नाहीत. सरकारी समितीने अहवालात हे नमूद केले आहे. मात्र इतके झाल्यावरही तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत रुग्णालयावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदण्यास पोलीस व सरकार तयार नाही. रुग्णालयानेही अजून दोन अहवाल यायचे आहेत असे म्हणत या विषयाला बगल दिली. आज डॉ. घैसास यांनी रुग्णालयातील पदाचा राजीनामा दिला. पण ज्या रुग्णालय प्रशासनाने डिपॉझिटचा हट्ट धरून उपचार केले नाहीत त्या प्रशासनाने मौन बाळगले. डीन धनंजय केळकर आज म्हणाले की, रुग्णाला थांबावे लागले नाही. डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा अधिक असल्याने त्यांची वागणूक काही वेळा बिघडते. ती सुधारण्याचा प्रयत्न करणार होते. ते कुटुंब प्रशासनाकडे आले असते तर हे घडले नसते. ते आधी रुग्णालयात आले होते. त्यामुळे त्यांना हे सहज शक्य होते. मात्र ते तिथेच थांबले आणि रागाने निघून गेले .
डॉ. केळकर म्हणाले की, मी शस्त्रक्रिया करीत असताना दोन सव्वादोन वाजता त्यांच्या नातेवाईकांचा फोन आला. पहिला फोन मी घेतला नाही. नंतर मी फोन घेतला तेव्हा मी त्यांना सांगितले की, तुमच्याकडे जितके पैसे आहेत तितके द्या. पण हा निरोप मी प्रशासनाला दिला नाही. आम्ही डिपॉझिट किती भरायचे ते कधीही लिहून देत नाही. त्या दिवशी कोणता राहू केतू आला आणि ते लिहून देण्यात आले. आम्ही फक्त अंदाजे एकूण खर्च लिहून देतो. महाराष्ट्र शासनाने ही जागा मंगेशकर ट्रस्टला दिली आणि त्यांनी ती आम्हाला दिली, यात करार झालेला नाही .
याप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने काल डॉ. राधाकिशन पवार यांच्या नेतृत्वात नेमलेल्या डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. नीना बोराडे, डॉ. नागनाथ येम्पल्ले, डॉ. कल्पना कांबळे यांच्या चौकशी समितीने तनिषा भिसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले होते. या समितीने आज आपला प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांना दिला. राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. या बैठकीला पुणे पोलीस आयुक्त अमितेष कुमार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या अहवालाची माहिती
माध्यमांना दिली.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, मी आढावा बैठकीआधी भिसे कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली. डॉक्टरांकडून उत्तम उपचार मिळण्यासाठी रुग्ण डॉक्टरांशी अनेक गोष्टी सांगतात. तनिषा भिसे 15 मार्चला गर्भवती महिला पहिल्यांदा डॉ. घैसास यांना भेटली होती. त्यामुळे त्यांना रुग्णाचा वैद्यकीय इतिहास पूर्णतः माहीत होता. ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाने चौकशीसाठी जी अंतर्गत समिती नेमली, त्या समितीने जो अहवाल दिला त्यात असे म्हटले आहे की, डॉ. घैसास यांनी स्वतःला वाचवण्यासाठी रुग्णाची गोपनीय माहिती सोशल मीडियावर जाहीर केली. ही माहिती गोपनीय ठेवण्याचा नियम असताना त्यांनी असे केले. याचा आम्ही निषेध करतो. राज्य महिला आयोगाने राज्य शासनाला या प्रकरणी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, आरोग्य विभागाने चार सदस्यीय समिती स्थापन केली. आणखी दोन समित्यांच्या माध्यमातूनही याचा तपास होईल. भिसे यांचा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने माता मृत्यू अन्वेषण समितीकडूनही या प्रकरणाची चौकशी होईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची नोंदणी धर्मादाय रुग्णालय अशी आहे. त्यांनी धर्मादाय नियमावलीचे पालन केले नाही. यामुळे धर्मादाय आयुक्तालयामार्फत नेमलेल्या समितीकडूनही वेगळी चौकशी होणार आहे. या तिन्ही समितीच्या अहवालानंतर या प्रकरणी अंतिम निष्कर्ष काढला जाईल.
चाकणकर यांनी ही घटना घडली त्या दिवसाचा घटनाक्रमही सांगितला. त्या म्हणाल्या की, आरोग्य विभागाच्या चौकशीच्या अहवालात असे स्पष्ट झाले आहे की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने तनिषा भिसे यांच्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव असतानाही सुमारे साडेपाच तास कोणतेही उपचार केले नाहीत. 28 मार्चला सकाळी 9 वाजून 1 मिनिटांनी त्या रुग्णालयात आल्या होत्या. त्यांना डॉक्टरांनी 2 एप्रिलला बोलावले होते. परंतु रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांनी 28 मार्चलाच डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांना रुग्णालयात येण्यास सांगण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रसूतीची तयारी करण्यास सांगितली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रियेची तयारी केली होती. मात्र, रुग्णाला शस्त्रक्रिया विभागात घेऊन जाण्याअगोदर त्यांच्याकडून 10 लाख रुपये डिपॉझिटची मागणी केली. हे सर्व रुग्णासमोरच सुरू होते. रुग्णाचे नातेवाईक तीन लाख रुपये भरायला तयार होते. इतर पैशांची व्यवस्था आम्ही उद्यापर्यंत करू, असे त्यांनी रुग्णालयाला सांगितले. दरम्यान, रुग्णालयाशी मंत्रालयातून संपर्क साधण्यात आला. तरीही रुग्णालय प्रशासनाने दखल घेतली नाही. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही रुग्णावर कोणतेही उपचार झाले नाहीत. उलट तुमच्याकडे औषधे असतील तर घ्या आणि तुमच्या पद्धतीने उपचार करा, असे रुग्णालयाने सांगितले. यात तनिषा यांचे मानसिक खच्चीकरण झाले. त्यामुळे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास तनिषा आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयाबाहेर गेले. तेथून ते ससून रुग्णालयात गेले. तिथले वातावरण पाहून रुग्णाची मानसिक स्थिती आणखी बिघडली. त्यामुळे तिथून ते 15 मिनिटांत बाहेर आले. ससूनमध्ये ते कोणालाही भेटले नाहीत. तेथून ते सूर्या रुग्णालयात गेले. त्याठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. याच रुग्णालयात तनिषाची प्रसूती झाली. पण मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्त्राव आणि खचलेली मनस्थिती यामुळे प्रसुतीनंतर दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी असा दावा केला आहे की, डॉक्टरांना संपूर्ण वैद्यकीय इतिहास माहीत असूनही 15 मार्चला फाईल बनवून त्यांना 2 एप्रिलला बोलावले. परिस्थिती गंभीर आहे, हे डॉक्टरांना आधीच माहिती होते. तर त्यांनी कागदपत्रे बनवायलाच नको होती. पण प्रसुतीसाठी आत जाण्यापूर्वी 10 लाखांची मागणी करण्यात आली. पैसे वेळेत न भरल्याने पाच तास रुग्ण कठीण परिस्थितीत होता. तनिषाच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे. उपचार मिळाले असते तर तनिषा वाचू शकली असती. दोषींना पाठीशी घातले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
याप्रकरणी वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या डॉ. सुश्रुत घैसास यांनी आज रुग्णालयाचे डीन डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा आमदार अमित गोरखे म्हणाले की, भिसे कुटुंबाचे सुरुवातीपासून म्हणणे होते की, या दुर्दैवी मृत्यूला डॉ. घैसास जबाबदार आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चांगले काम करत आहे. पुढेही करेल. राज्य सरकारने व मंगेशकर कुटुंबाने ज्या उदात्त हेतूने हे रुग्णालय सुरू केले होते, त्या हेतूला काळीमा फासण्याचे काम डॉ. घैसास यांच्या कृतीने केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी आमची मागणी होती. आज त्यांनी राजीनामा दिला. याचाच अर्थ तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांना कुठेतरी अपराधीपणा वाटत होता. आपण कुठेतरी चुकलोय ही भावना त्यांच्या मनात आली असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला असावा.