१,२०० टन सोने परत आणा जर्मनीच्या खासदाराची मागणी

फ्रँकफर्ट – अमेरिकेने लागू केलेल्या आयात कर धोरणाचा परिणाम आता सोन्यावर होऊ लागल्याचे दिसत आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या तिजोरीत ठेवलेले आपले १,२०० टन सोने परत आणा, अशी मागणी जर्मनीत होऊ लागली आहे. यामुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जर्मनीतील क्रिश्चियन डेमोक्रॅटिक युनियन या परंपरावादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अमेरिकेतील सोने परत आणण्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली. हा पक्ष जर्मनीतील पुढील सरकारचे नेतृत्व करू शकण्याची शक्यता आहे. जर्मनीने आपले संपूर्ण सोने फ्रँकफर्ट किंवा किमान युरोपात परत आणावे, अशी वेळ आल्याचे खासदार आणि युरोपियन टॅक्सपेअर असोसिएशनचे सदस्य मायकेल जेगर यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेत जर्मनीचे सुमारे १,२०० टन सोने आहे. त्याची किंमत सुमारे १२० अब्ज डॉलर (११३ अब्ज युरो) इतकी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने हे सोने अमेरिकेत ठेवले होते. गरज पडल्यास ते विकून डॉलर मिळवता यावेत, हा हेतू यामागे होता. परंतु आता ते जर्मनीत परत आणण्याची मागणी होत आहे. या निर्णयामुळे डॉलरची जागतिक गरज कमी होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. जर्मनीने खरेच हा निर्णय घेतला तर अन्य देशही त्यांच्या अमेरिकेत असलेल्या सोन्याची मागणी करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे सोन्याची किंमत, डॉलरची विश्वासार्हता आणि फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक धोरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.