टाटांच्या जॅग्वारने अमेरिकेला होणारी निर्यात थांबवली

लंडन – टाटा उद्योग समुहातील टाटा मोटर्स ची मालकी असलेल्या जॅग्वार आणि लँडरोव्हर या ब्रिटनमधील सर्वात मोठ्या वाहन निर्मिती कंपनीने अमेरिकेने लावलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे आपल्या वाहनांची अमेरिकेत होणारी निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
जॅग्वार अँड लँडरोव्हर कंपनी वर्षाला सुमारे चार लाख रेंज रोव्हर स्पोर्टस, डिफेंडर आणि अन्य मॉडेल्सची निर्मिती करते. कंपनीच्या वाहनांची २५ टक्के निर्यात अमेरिकेत होत असते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धात ब्रिटनमधून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर २५ टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.

जॅग्वार अँड लँडरोव्हर कंपनी आपल्या प्रचंड निर्मिती क्षमतेमुळे ब्रिटनच्या वाहननिर्मिती क्षेत्रात अग्रणी आहे. ब्रिटनच्या वाहन उद्योगातील प्रत्येक ८ पौंडच्या कमाईमध्ये १ पौंड जॅग्वारच्या खात्यात जातो. अमेरिकेचे २५ टक्के आयात शुल्क गेल्या गुरुवारपासून लागू झाले आहे. त्यामुळे जॅग्वारने तुर्त अमेरिकेत होणारी निर्यात थांबवली आहे.