ठाणे – बिहार राज्यातील बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी १६ एप्रिलपासून दहा दिवस ठाणे शहरात भंते गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जाणार आहे. त्यानंतर २७ एप्रिल रोजी महाथेरो यांच्या उपस्थितीत महारॅलीचे आयोजन केले आहे, अशी माहिती बुद्धगया आंदोलनाचे संयोजक भंते विनाचार्य यांनी दिली.
भंते विनाचार्य यांनी सागितले की, १६ ते २६ एप्रिल दरम्यान भंते गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जाणार आहे. तर, २७ एप्रिल रोजी स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी महारॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सुमारे लाखभर लोक सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे बुद्ध जयंतीच्या दिवशी म्हणजे १२ मे रोजी १२ लाख बौद्ध अनुयायी बुद्धगया येथे उपस्थित राहणार आहेत. पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे. ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी देशभर आंदोलने सुरू आहेत. त्याच अनुषंगाने २७ एप्रिल रोजी ठाण्यात मोर्चा काढला जाणार आहे.