सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा निर्णय
मुंबई -श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना लवकरच राबविण्यात येणार आहे.या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण यासाठी मदत करणे हा आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या बालिकांच्या नावाने १० हजार रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट त्यांच्या आईच्या बँक खात्यावर ठेवले जाणार आहे.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि माझी कन्या भाग्यश्री योजना आहेत. त्याच धर्तीवर सिद्धिविनायक ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या अंतिम मान्यतेनंतर योजनेच्या अंमलबजावणीसाठीचे निकष जाहीर केले जातील अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.