नवी दिल्ली – भारतातर्फे सर्वाधिक ३२० आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळणारी व १५८ गोल करणारी आघाडीची हॉकीपटू वंदना कटारिया हिने आंतरराष्ट्रीय हॉकी मधून निवृत्तीची घोषणा केली आहे.वंदना कटारिया २०२० मधील टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाची महत्त्वाची खेळाडू होती. ३२ वर्षीय वंदनाने काल इन्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपली निवृत्ती घोषित केली. ती म्हणाली की, आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर घेतलेला हा निर्णय माझ्यासाठी आनंद व दुःख देणारा अनुभव देणारा आहे. मी थकल्याने किंवा हॉकीप्रती प्रेम कमी झाल्यामुळे निवृत्त होत नसून मला वाटते की आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावरच हा निर्णय घेतला पाहिजे. देशाची जर्सी परिधान करणे माझ्यासाठी नेहमीच अभिमानास्पद होते. टोकियो ऑलिंपिकमध्ये दक्षिण अफ्रिकेबरोबर लागोपाठ केलेले तीन गोल माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण होते.वंदना कटारिया भारतातर्फे आक्रमण सांभाळणारी हॉकीपटू होती. तिने ३२० सामन्यांमध्ये खेळत १५८ गोल केले. तिला अर्जुन पुरस्कारांसह अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
