IPL 2025 : मुंबईकडून पदार्पण, पहिल्याच बॉलवर विकेट… चर्चेत आलेला अश्वनी कुमार कोण आहे? जाणून घ्या

MI vs KKR Ashwani Kumar | इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) च्या 12व्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सचा (MI vs KKR, IPL 2025) 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमार (Ashwani Kumar) चर्चेत राहिला. पंजाबच्या 23वर्षीय डावखुर्या वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने सोमवारी (३१ मार्च) वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) कडून पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आपल्या वेगळ्या शैलीने छाप सोडली.

अश्विनी कुमारने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने भेदक गोलंदाजी करत कोलकाताला मोठे धक्के दिले आणि 4 महत्त्वपूर्ण विकेट घेतले.

सत्यनारायण राजूच्या जागी खेळण्याची संधी मिळालेल्या अश्वनीने त्याच्या पदार्पणातच कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधार अजिंक्य रहाणेला आपल्या पहिल्या चेंडूवर बाद केले. रहाणेचा झेल डीप बॅकवर्ड पॉइंटवर तिलक वर्मा याने घेतला. त्याने एकाच षटकात रिंकू सिंग आणि मनीष पांडे यांना माघारी धाडले. रिंकूला नमन धीरने झेलबाद केले, तर मनीषला अश्वनीने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर, अश्विनीने आंद्रे रसेललाही बोल्ड करत कोलकाताच्या अडचणी वाढवल्या. अश्विनीने आपल्या 3 षटकांच्या स्पेलमध्ये 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

यावेळी, मिचेल सैंटनरने वेंकटेश अय्यरचा एक कठीण झेल सोडला, मात्र अश्विनी आयपीएलमध्ये पदार्पण करत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी 2019 मध्ये अल्झारी जोसेफने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना डेविड वॉर्नरची विकेट घेतली होती. अश्वनी हा आयपीएल पदार्पणात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा 10वा गोलंदाज आहे.

कोण आहे अश्वनी कुमार? (Who Is Ashwani Kumar)

अश्विनी कुमार डेथ ओव्हर्स मध्ये आपली खास गोलंदाजीची शैली दाखवतो. 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपयांना आपल्या संघात सामील केले. यापूर्वी तो पंजाब किंग्सच्या (PBKS) संघाचा भाग होता, पण त्याला एकाही सामन्यात अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

अश्विनीने 2022 मध्ये सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबसाठी पदार्पण केले होते. त्याने पंजाबसाठी दोन प्रथम श्रेणी आणि चार लिस्ट ए सामनेही खेळले आहेत. पंजाबच्या शेर-ए-पंजाब टी20 टूर्नामेंटमध्ये त्याच्या शानदार प्रदर्शनामुळे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले.

याव्यतिरिक्त, अश्विनी मुंबई इंडियन्ससाठी या हंगामातील चौथा पदार्पण करणारा खेळाडू ठरला. विग्नेश पुथुर, सत्यनारायण राजू आणि रॉबिन मिंज यांनी मुंबईकडून पदार्पण केले आहे.