लखनौ- सोमवारी 31 एप्रिलला येणाऱ्या रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी ईदच्या दिवशी रस्त्यांवर, इमारतीच्या छतावर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई केली आहे. मुस्लिमांना केवळ मशिदी आणि ईदगाहच्या आत नमाज अदा करण्यास सांगण्यात आले आहे. लाऊडस्पीकरनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱ्यांचे पासपोर्ट जप्त केले जाणार आहेत. महाराष्ट्रातही सार्वजनिक रस्त्यांवर नमाज पठण आणि प्रदुषणाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या लाऊडस्पीकरवर कायद्याने बंदी आहे. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
उत्तर प्रदेशात सर्वत्र व खासकरून मेरठ आणि संभल पोलिसांनी नमाजबाबत आदेश दिले आहेत. रमजान ईद 31 मार्चला आहे, तर अलविदा जुम्मा 28 मार्चला आहे. मेरठचे पोलीस अधीक्षक विपिन ताडा म्हणाले की, या दिवशी जवळच्या मशिदी किंवा ईदगाहमध्येच नमाज अदा करा, असे आवाहन आम्ही मुस्लीम धर्मगुरू आणि धार्मिक नेत्यांना केले आहे. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर नमाज अदा करण्यास परवानगी दिली जाणार नाही. रस्त्यावर नमाज अदा करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याबाबत पोलीस ठाण्यांना माहिती दिली आहे. पोलिसांच्या बरोबर निमलष्करी दल, शीघ्र कृती दल यांनादेखील आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी तैनात केले जाणार आहे.
याबाबत शहर पोलीस आयुक्त आयुष विक्रम सिंह म्हणाले की, मशिदी आणि ईदगाहव्यतिरिक्त लोक ईदच्या दिवशी फैज-ए-आम इंटर कॉलेजमध्येही नमाज अदा करू शकतात. प्रशासनाने मौलवींना या निर्णयाची माहिती सर्वांना देण्यास सांगितले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कोणी रस्त्यावर नमाज अदा करताना आढळले तर त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला जाईल आणि त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची शिफारस केली जाईल. पासपोर्ट रद्द केल्यानंतर रस्त्यांवर नमाज पठण करणाऱ्यांना मक्केला प्रवास करता येणार नाही.
संभलच्या पोलिसांनीही असेच आदेश मुस्लिमांना दिले आहेत. संभल येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शांतता कमिटीची बैठक झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला. संभलचे सहपोलीस आयुक्त शिरीष चंद्रा म्हणाले की, शांतता कमिटीच्या बैठकीला सर्व जाती-धर्माचे लोक होते. त्यात असा निर्णय घेण्यात आला की, ईदची नमाज आणि प्रार्थना फक्त मशीद आणि ईदगाहच्या आतच व्हावी. मशिदी आणि ईदगाहमधील वीज आणि पाणी यांची समस्या दूर करण्यासाठी संबंधित विभागांना सांगितले जाणार आहे.
उत्तर प्रदेशात यापूर्वी होळी आणि रमजानचा शुक्रवार एकत्र आल्याने वाद झाला होता. होळीचा रंग मशिदीवर उडू नये यासाठी प्रथमच अनेक मशिदी मेणकापडाने झाकण्यात आल्या होत्या. त्यावेळी शुक्रवारचा नमाज वर्षात 52 वेळा येतो. होळी वर्षातून एकदाच येते, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे संभलचे मंडल अधिकारी अनुज चौधरीही या बैठकीला उपस्थित होते. ते म्हणाले की, मी केलेले वक्तव्य इतके चुकीचे होते, तर त्या विरोधात त्यांनी कोर्टात जायला हवे होते. मी हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजांतील लोकांशी याबाबत बोललो आहे. पण माझे असे म्हणणे आहे की, तुम्हाला ईदीच्या शेवया खायला घालायच्या असतील, तर तुम्हाला आम्ही दिलेले गुजिया (होळीसाठी तयार केला जाणारा एक पदार्थ) खावा लागेल.
