नवी दिल्ली- महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत गेले काही दिवस वाद सुरू आहे. हा पुतळा काढावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी केली. त्यानंतर धनगर समाज व विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला. आता संभाजीराजे छत्रपती यांनी आज वाघ्या पुतळ्याबाबत पुरावा नसल्याची कागदपत्र दिल्लीत पत्रकार परिषदेत मांडली आणि हा पुतळा हटवावा अशी पुन्हा मागणी केली.
ते म्हणाले की, पुरातत्व खात्याने माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे सांगितले आहे की वाघ्या कुत्र्याचे स्मारक याची त्यांच्या सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठेही नोंद नाही. राज संन्यास या नाटकातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवावे.
गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून वाद सुरु आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. या समाधीची उंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षाही जास्त आहे. याआधीही अनेकदा वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा मुद्दा अनेक शिवप्रेमींनी उपस्थित केला होता. आता छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपतींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावरून हटवण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारला दिले. मात्र त्यांच्या या मागणीला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि संपूर्ण धनगर समाजाने विरोध केला आहे. त्यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिल्लीत पुरातत्त्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.
संभाजीराजे म्हणाले की, वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवावे असे मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. आज मी पुरातत्त्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली. त्यांना सविस्तर इतिहास सांगितला. माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक शिवभक्तांनी पुरातत्व खात्याकडून जी माहिती मिळवली होते त्याची मांडणी तिथे केली. पुरातत्त्व खात्याने माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे सांगितले आहे की वाघ्या कुत्र्याचे स्मारक याची त्यांच्या सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठेही नोंद नाही.
वाघ्या कुत्र्याचे स्मारक 1936 ला पूर्ण झाले. 2036 पर्यंत ते स्मारक काढले नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळांच्या यादीत समाविष्ट होईल ही माहितीही पुरातत्त्व खात्याने दिली आहे. त्यामुळे या विषयावर मी आता बोलत आहे. अनेक शिवभक्तांनीही पूर्वी या विषयावर भाष्य केले आहे. दुर्दैवाने त्यावर न्याय मिळाला नाही म्हणून मी ही मागणी पुन्हा करतो. मी सरकारला 31 मेचा अल्टीमेटम दिलेला नाही. राज्य शासनाचे धोरण आहे. धोरण सांगते की 31 मे पर्यंत गडकोटांवरील अतिक्रमण काढा. त्यामुळे मी विनंती केली की, ज्या वाघ्या कुत्र्याचे पुरावे नाही ते सुद्धा 31 मे पर्यंत काढून टाका.
संभाजीराजे पुढे म्हणाले की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नी दिला जात होता तेव्हा वाघ्या कुत्र्याने त्यात उडी घेतल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत. यावेळी संभाजीराजेंनी तीन वेगवेगळे फोटो दाखवत तिथे वाघ्या कुत्र्याची समाधी नव्हती असे सांगितले. डाव्या, उजव्या अशा कुठल्याही विचारसरणीच्या इतिहासकारांनी याचा उल्लेख केला नाही. वाघ्या कुत्र्याचे स्मारक का उभे राहिले? यावर अनेक वाद आहेत. महाराष्ट्रातील एकाही इतिहासकाराने वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणून सांगितलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुत्रे असू शकतात. पण राज संन्यास या नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली. त्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. त्याच नाटकात वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली आणि त्याचे स्मारक तिथे बांधण्यात आले. दुर्दैवाने तुकोजीराव होळकर महाराजांचे नाव तिथे जोडले जात आहे. त्यांनी या स्मारकासाठी
पान 1 वरून
मदत केली असे म्हटले जात आहे. मात्र, मला स्पष्ट करायचे आहे की मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वराज्य स्थापनेसाठी योगदान दिले. अशावेळी तुकोजीराव महाराज कुत्र्याच्या समाधीला मदत कशी करतील? तुम्ही त्यांना बदनाम करत आहात. छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे जुने संबंध आहेत. धनगर बांधवांचे आणि आमचे जवळचे नाते आहे . माझा चालक, स्वयंपाकी, अंगरक्षक सगळे धनगर असल्याचे त्यांनी सांगितले.
