मुंबई- भाजपाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे मोबाईलवर त्यांचे नग्न फोटो पाठवून मला त्रास देतात, असा धक्कादायक आरोप करणाऱ्या महिलेनेच गोरे यांच्याकडून 1 कोटी रुपये रोकड घेतली. ही रोकड स्वीकारताना तिला आज रंगेहाथ पकडण्यात आले.
गोरेंवर आरोप करणाऱ्या या महिलेला खंडणी म्हणून 1 कोटी रुपयांचा पहिला हप्ता घेताना साताऱ्यात अटक करण्यात आली. हे प्रकरण मिटवण्यासाठी या महिलेने 3 कोटींची मागणी केली होती. त्यातील एक कोटी स्वीकारताना तिला अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला. परंतु या महिलेने खरोखरच खंडणी घेतली की, तिला यात गोवण्यात आले आहे, असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सुळे यांनी मागणी केली की, गोरे यांच्याकडे 1 कोटी रुपये रोकड आली कुठून याची चौकशी झाली पाहिजे.
सातारा पोलिसांनी सांगितले की, जयकुमार मोरे यांच्यावर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने वाई येथील काँग्रेसचे कार्यकर्ते विराज शिंदे यांच्याकडे मागणी केली की, जयकुमार गोरे यांनी गप्प राहण्यासाठी तीन कोटी रुपये द्यावे. त्यानुसार त्यांच्यात बोलणी होऊन सुरुवातीला एक कोटी रुपये देण्याचे ठरले. हे पैसे स्वीकारताना आज महिलेला अटक करण्यात आली. या प्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना अटक करण्यात आली आहे.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील या महिलेने काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की, 2017 मध्ये सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी काही कारण नसताना तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतःचे नग्न फोटो तिला व्हॉट्सॲपवर पाठवले. तिने सातारा पोलिसांकडे याची तक्रार दाखल केली. त्यानंतर गोरेंवर गुन्हा दाखल झाला. अटक टाळण्यासाठी गोरेंनी आधी सातारा जिल्हा न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गोरे यांना अटक होऊन 10 दिवस तुरुंगात जावे लागले. यानंतर गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात तिला पुन्हा त्रास देणार नाही, असे वकिलांमार्फत लिहून दिले आणि हा खटला संपला. मात्र राज्यात महायुती सरकार आल्यावर जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री बनले. त्यानंतर तिचा त्रास पुन्हा सुरू झाला. जानेवारी 2025 पासून वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तिने 2017 मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल होऊ लागली. त्यामुळे तिचे नाव उघड झाले व तिची बदनामी झाली. 9 जानेवारी 2025 रोजी तिच्या घरी पत्र आले. त्यातही 2017 च्या तक्रारीचे कागदपत्र होते. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना अपमान आणि बदनामीला सामोरे जावे लागले. या प्रकरणाची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना माहिती देऊनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. आपल्यावर दबाव आणण्यासाठी दोन कोटींची खंडणी मागितल्याची खोटी तक्रार गोरे यांनी पीए अभिजित काळेमार्फत केल्याचा दावाही महिलेने केला. त्यानंतर तिने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून न्याय न मिळाल्यास राजभवनाबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर विरोधकांनी जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अधिवेशनातही हे प्रकरण गाजले होते. गोरे यांनी हे सगळे आरोप फेटाळले होते. मात्र, धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ भाजपाच्या दुसऱ्या मंत्र्यावर आरोप झाल्याने सरकारची अडचण झाली होती. हे प्रकरण उघड करणारे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली आहे. 17 मार्चला ही महिला मुंबईत उपोषणाला बसणार होती. मात्र ती आलीच नाही. आज तिला पैसे घेताना अटक झाली.
या महिलेला अटक केल्यानंतर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या देशाने आणि याच डबल इंजिन सरकारने नोटबंदी केली. मग 1 कोटी रुपयांची रोकड आली कुठून? की हा सरकारचा खोटानाटा खेळ आहे? महिलेने एक कोटी रुपये खरेच मागितले होते का? तिच्या पिशवीमध्ये ते पैसे मुद्दाम टाकण्यात आले की, खरेच तिच्याकडे काही आढळले आहे? याची उत्तरे मिळायला हवीत.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, जयकुमार गोरे यांनी त्या महिलेला एक कोटी रुपये दिले. हे पैसे त्यांच्याकडे आले कुठून, हा मोठा प्रश्न आहे. आपण काही चूक केलेली नाही असे गोरेंना वाटत असेल तर इतके पैसे तिला देण्यासारखे तिच्याकडे काय आहे? तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात, तर तुमच्याकडे कुणी पैसे मागत असल्यास पोलिसांत जाता आले असते. पण तुम्ही पैसे पाठवले. गोरेंनी महिलेसोबत करार केला होता की, तिला त्रास देणार नाही. त्या करारामुळे ते कोर्टातून सुटले. पण तो करार करण्याची गरज काय होती? हायकोर्टमधील महिला न्यायाधीशांनी त्या प्रकरणी ताशेरे का ओढले? या सर्व गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. त्या महिलेला कशी अटक केली आहे, त्याचाही अभ्यास केला पाहिजे.
