Mahashivratri 2025: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा पवित्र दिवस मानला जातो. तसेच, भक्त महादेवाची आराधना करून उपवास आणि रात्रभर जागरण करतात.
श्रद्धेनुसार, या दिवशी शिवलिंगावर दूध, पाणी, बेलपत्र अर्पण केल्याने पापक्षालन होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. यंदा महाशिवरात्री कधी आहे व पुजा विधी कशाप्रकारे केली जाते? याविषयी जाणून घेऊयात.
महाशिवरात्रीचे महत्त्व
महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या उपासनेचा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतानुसार, महाशिवरात्रीचा व्रत दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर करणे शुभ मानले जाते. या दिवशी उपवास, जागरण आणि शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.
यंदा महाशिवरात्री कधी आहे?
महाशिवरात्रीचे व्रत फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला पाळले जाते. 2025 मध्ये ही तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 वाजता सुरू होऊन 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 वाजता संपेल. धार्मिक परंपरेनुसार, पूजाविधी चतुर्दशी तिथी असलेल्या दिवशीच केले जातात, त्यामुळे यावर्षी हा सण 26 फेब्रुवारीला साजरा केला जाईल. या दिवशी भक्त उपवास ठेवतात.