उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू, नेमके काय बदल होणार? वाचा

UCC in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्यात आला आहे. हा कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. हा कायदा बाहेर राहणाऱ्या उत्तराखंडच्या नागरिकांना देखील लागू असणार आहे. यासोबतच, उत्तराखंड सरकारने ucc.uk.gov.in या पोर्टलचे उद्घाटन देखील केले. उत्तराखंडनंतर आता इतर राज्य देखील अनुकरण करून हा कायदा लागू करण्याची शक्यता आहे.

समान नागरी कायदा लागू झाल्याने उत्तराखंडमध्ये कायद्यात मोठा बदल झाला आहे. सरकारने सर्व नागरिकांना समान अधिकार देण्याच्या उद्देशाने समान नागरी संहिता कायदा तयार केला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हा कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये उत्तराखंडच्या विधानसभेत या कायद्याला मंजूरी देण्यात आली होती.

समान नागरी कायद्यांतर्गत आता राज्यात सर्व स्त्री व पुरुषांसाठी विवाहाचे समान वय निश्चित करण्यात आले आहे. कायद्यानुसार आता सर्वधर्मातील पुरुषांसाठी 21 वर्ष व स्त्रीयांसाठी 18 वर्ष हे लग्न करण्याचे वय निश्चित करण्यात आले आहे. घटस्फोटोसाठी देखील सर्वांसाठी समान नियम असतील.

याशिवाय, लग्नानंतर 60 दिवसानंतर नोंदणी करणे आवश्यक आहे. लिव्ह इन नात्याला मान्यता हवी असल्यास त्याबाबतची नोंदणी देखील आवश्यक आहे. या अंतर्गत बहूपत्नीत्व आणि हलाला प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्यामध्ये अनुसूचित जनजातींचा समावेश करण्यात आलेला नाही.