नासाच्या Axiom Mission 4 साठी निवड झालेले शुभांशु शुक्ला कोण आहेत? जाणून घ्या

Axiom Mission 4: नासाच्या एक्सियम मिशन 4 (Axiom Mission 4) साठी भारतीय हवाई दलाचे अधिकारी शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) यांची पायलट म्हणून निवड झाली आहे. नासाचे हे मिशन 14 दिवसांचे असणार आहे. या मिशनचा मुख्य उद्देश संशोधन करणे हा आहे. या मिशनसोबतच, शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरतील.

शुभांशु शुक्ला हे स्पेस एक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे ते पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरणार आहे. यापूर्वी एप्रिल 1984 मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. एक्सियम मिशन 4 मध्ये शुभांशु शुक्ला हे पायलट असतील. याआधी त्यांच्या भारताच्या गगनयान मिशनसाठीही निवड झालेली आहे.

एक्सियम मिशन अंतर्गत इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) साठीचे पहिले खाजगी मिशन 1 एप्रिल 2022 रोजी लाँच करण्यात आले होते. त्यानंतर, 2 मे 2023 रोजी दुसरे मिशन सुरू झाले.तिसरे मिशन जानेवारी 2024 मध्ये सुरू झाले होते. आणि आता एक्सियमचे चौथे मिशन सुरू होण्याच्या तयारीत आहे. चौथे मिशन 14 दिवसांचे असणार आहे.

कोण आहेत शुभांशु शुक्ला?

भारतीय हवाई दलाचे फाइटर पायलट शुभांशु शुक्ला यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 रोजी उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे झाला. त्यांनी एनडीएमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर 17 जून 2006 रोजी त्यांना एअरफोर्सच्या फाइटर विंगमध्ये समाविष्ट करण्यात आले. सध्या ते हवाई दलात ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत आहेत.

शुभांशु शुक्ला यांच्याकडे 2,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे, ज्याला एव्हिएशनच्या भाषेत ‘फ्लाइंग आवर्स’ असे म्हणतात. त्यांच्याकडे Su-30 MKI, MiG-21, MiG-29, जॅगआर, हॉक, डोर्नियर आणि An-32 सह अनेक विमानाच्या उड्डाणाचा अनुभव आहे.