मुंबई- उत्तर भारतातील हिवाळ्याच्या तडाख्याने मानवावरच नव्हे तर सागरी सृष्टीवरही परिणाम केला आहे.आता मुंबईच्या समुद्रातील थंड पाण्यात माशांना जगणे कठीण झाले आहे. अरबी समुद्रातून माशांना २०० किमी दूर पळावे लागत आहे. मुंबईतील किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्राच्या विस्तीर्ण भागाला धुक्याने वेढले असल्याने माशांना उष्ण पाण्याकडे जाण्यास भाग पडले आहे. यामुळे मच्छीमारांमध्ये प्रचंड आव्हाने निर्माण झाली आहेत.
धुक्यामुळे माश्यांनी पलायन केल्याने मच्छीमारांना मासे पकडण्यासाठी २०० किलोमीटर आत समुद्रात दूर जावे लागत आहे. वर्सोव्याजवळ पकडला जाणारा बोंबिल मासा आता पालघरच्या पलीकडे गुजरातच्या दिशेला आढळत आहे.त्याचप्रमाणे सार्डिन मासे उत्तरेकडून मुंबई दक्षिणेकडे सरकले आहेत.मासे उबदार पाण्यात स्थलांतरित होत असल्याने पकडणे अवघड होत आहे आणि त्यांच्या शहरातील बाजारपेठेतील किमती वाढत आहेत. हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबईतील धुके समुद्राकडे झेपावले आहेत. ते सध्या किनाऱ्यापासून ४०-५० नॉटिकल मैल पसरले आहे. धुक्यामुळे मासेमारीच्या जहाजांची दृश्यमानता २ किमीपर्यंत कमी झाली आहे.