केजरीवालांनी लाडकी बहीण जाहीर करताच योजना बंद करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिल्लीतील आप सरकारने राज्यात महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1,000 रुपये देण्यात येणार आहेत. तसेच निवडणुकीनंतर आपचे सरकार आल्यास 2,100 रुपये देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. मात्र आज या योजनेला एक वेगळेच वळण लागले. ही योजना फसवणूक करणारी असून, अशी कोणतीही योजना सरकारतर्फे सुरू नसल्याची जाहिरात दिल्ली सरकारच्याच दोन विभागांनी प्रसिद्ध केली. मोदी सरकारचे हुकूम पाळणारे दिल्लीचे नायब राज्यपाल हेच या जाहिरातीमागे असल्याचे उघड गुपित आहे. दुसरीकडे दिल्लीतील एका भाजप नेत्याने चक्क खासगी स्वरूपात महिलांना 1,100 रुपये द्यायला सुरुवात केली. त्यावरून आप आणि भाजपात पुन्हा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.
दिल्लीमध्ये पुढील दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी आपकडून मतदारांना भुलवण्यासाठी अनेक आमिषे दाखवली जात आहेत. त्यात महिला सन्मान योजनेचाही समावेश असून या योजनेत महिलांना 1,000 रुपये तर आपने निवडणूक जिंकल्यास 2,100 रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बिथरलेल्या भाजपाने या योजनेविरोधात सुरुवातीपासून टीका करायला सुरुवात केली होती. केजरीवाल आणि आप सरकारचा या योजनेतून मते मिळवण्याचा डाव यशस्वी होऊ नये म्हणून भाजपाने डावपेच आखायला सुरुवात केली होती. आज भाजपाने सरकारी अधिकार्‍यांच्या आडून वेगळीच खेळी खेळली. दिल्ली सरकारच्या महिला व बालविकास आणि आरोग्य व कुटुंब कल्याण या दोन विभागांनी एक जाहिरात प्रसिद्ध केली. प्रसिद्धीपत्रकाच्या स्वरूपात असलेल्या या जाहिरातीत म्हटले होते की, अशी कोणतीही योजना दिल्ली सरकारकडून राबवण्यात येत नसल्यामुळे यासंदर्भात नोंदणीसाठी येणारे अर्ज स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणतीही व्यक्ती किंवा राजकीय पक्ष योजनेसाठी नोंदणीच्या नावाखाली महिलांची माहिती गोळा करत असेल, तर ते फसवणूक करत असून, त्यांना असे करण्याचा कोणताही अधिकार नाही.
ही जाहिरात प्रसिद्ध होताच खळबळ माजल्यावर दिल्लीच्या मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेत सरकारी अधिकार्‍यांवर आरोप केला की, त्यांनी भाजपाच्या दबावाखाली येऊन ही जाहिरात दिली आहे. एवढेच नव्हे तर दिल्लीचे माजी खासदार व भाजपाचे नेते परवेश वर्मा यांच्या घरी कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आली असून, ते गरिबांना पैसे वाटप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, आमच्यावर आरोप करण्यापेक्षा खरोखर सरकारला काही करायचे असेल तर ईडी-सीबीआय आणि दिल्ली पोलिसांनी परवेश वर्मा यांच्या निवासस्थानावर छापे टाकावेत. त्यांना अटक करावी. या प्रकरणी निवडणूक आयोगानेही उत्तर द्यावे. भाजपा पैशाच्या जोरावर हरलेली निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचे संपूर्ण सत्य समोर आले आहे. त्यांच्याकडे अजेंडा नाही. त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांचा चेहरा नाही. त्यांच्याकडे दिल्लीतील जनतेसाठी कोणतेही आश्वासन नाही.
आतिशी यांच्या या दाव्यानंतर काही टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी परवेश वर्मा यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा तिथे महिला गोळा झाल्याचे दिसले. परवेश वर्मा यांनी त्यांना मतदार ओळखपत्र घेऊन बोलावले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून एक अर्ज भरून घेण्यात आला होता. त्यांना लाडली योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले होते. त्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची छायाचित्रे होती. या कार्डाबरोबर असलेल्या पाकिटात रोख 1100 रुपये होते. हे कार्ड दाखवल्यास निवडणुकीनंतर तुमच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा करण्यात येतील, असे आश्वासनही महिलांना देण्यात आले. या महिलांनी वाहिन्यांच्या प्रतिनिधींना पैसे आणि कार्डही दाखवली. मात्र, परवेश वर्मा यांच्या वडिलांच्या ट्रस्टकडून अशी आर्थिक मदत याआधीही दिली जात असल्याचेही सांगण्यात आले. या घटनेवर संताप व्यक्त करत नंतर आपने परवेश शर्मा यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
दुसरीकडे भाजपाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले. परवेश यांनी पैसे वाटले नाहीत. हा केजरीवालांचा काळा पैसा आहे. केजरीवाल यांनीच या महिलांना परवेश वर्मा यांच्या घरी पाठवल्याचे दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले.
दिल्ली काँग्रेसने आज 12 कलमी श्‍वेतपत्रिका काढून आपवर टीका केली. ‘मौका मौका हरबार धोका’ असे या श्‍वेतपत्रिकेचे नाव आहे. ही श्‍वेतपत्रिका जारी करताना काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले, केजरीवाल हे देशातील सगळ्यात मोठे फ्रॉड किंग आहेत. त्यांना केजरीवाल यांच्याऐवजी फर्जिवाल म्हणायला हवे.

आतिशींना अटक करण्याचा प्रयत्न?
केजरीवाल यांनी भाजपावर आणखी एक आरोप करत खळबळ उडवून दिली. केंद्र सरकार पर्यटन विभागाच्या माध्यमातून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात एक बनावट गुन्हा दाखल करणार असून, त्याद्वारे आतिशी यांना अटक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top