सिमला-हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असून यामुळे राज्यातील ३० राजमार्ग आणि २ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत.काल मनालीमध्ये तर बर्फवृष्टी आणि दाट धुक्यामुळे सोलंग नाल्यापासून अटल बोगद्यापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.अटल बोगद्यात एक हजारहून अधिक वाहने अडकली.अखेर मनाली प्रशासनाने तात्काळ अटल बोगद्याजवळ दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सध्या नाताळची सुट्टी असल्याने बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी काश्मीर,सिमला, मनालीमध्ये गर्दी केली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक मनालीत आल्याने आधीच येथील रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली आहे. त्यातच बर्फवृष्टीमुळे येथील अनेक मार्ग बंद करण्यात आल्याने ही गर्दी अधिकच वाढली आहे.बर्फवृष्टीमुळे राज्यातील सार्वजनिक सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या आहेत.मनाली प्रशासनाने आतापर्यंत ७०० वाहनांना अटल बोगद्यातून बाहेर काढल्याचे म्हटले आहे.