मुंबई – भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय दर आठवड्यातील बुधवारी आपल्या साप्ताहिक सुटीसाठी बंद ठेवण्यात येते. मात्र उद्या नाताळ सणानिमित्त सरकारी सुट्टी आहे. त्यामुळे महापालिकेने राणीची बाग उद्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसर्या दिवशी म्हणजे २६ डिसेंबर रोजी राणीची बाग बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राणी बाग प्रशासनाने दिली आहे.
राणीची बाग दर बुधवारी प्राणी व पक्षी यांच्या देखभालीसाठी आणि प्राणी पिंजरे दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे राणी बाग प्रशासन,कर्मचारी यांना आणि प्राणी, पक्षी यांनाही काहीसा दिलासा मिळतो. मात्र,मुंबई महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसर्या दिवशी बंद ठेवण्यात येते.