सोलापूर – नववर्षात १ जानेवारी २०२५ पासून पंढरपुरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या सर्व पूजांची ऑनलाईन नोंदणी पद्धतीने होणार आहे. यासंदर्भात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेत स्थळावर भाविकांना पुजेसाठी पुढील तीन महिन्यांची नोंदणी करता येणार असल्याचे समितीने सांगितले.
पंढरपुरात श्री विठ्ठल व रुक्मिणी दर्शनासाठी येणारे भाविक पूजाविधी करतात. मात्र आतापर्यंत पूजा नोंदणीसाठी भाविकांना प्रत्यक्ष हजर राहून नोंदणी करावी लागत होती. त्यामुळे भाविकांना पूजेसाठी बराच कालावधी प्रतीक्षा करावी लागत होती. तसेच पूजाविधीसाठी मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर उपाय म्हणून आणि विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्य, तुळशी आणि पाद्यपूजेमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मंदिर समितीने प्रथमच ऑनलाईन नोंदणी सुविधा सुरु केली आहे. भाविकांनी या नव्या सुविधेचे स्वागत केले.