क्वालालुंपूर
१० वर्षांपूर्वी ८ मार्च २०१४ रोजी मलेशियन एअरलाइन्सचे एक विमान २३९ प्रवासी आणि कर्मचार्यांसह बेपत्ता झाले होते. अनेक वर्षे प्रयत्न करूनही हे विमान न सापडल्याने त्याचा शोध थांबवण्यात आला होता. आता मलेशिया सरकारने या विमानाचा शोध पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा मलेशियाचे परिवहन मंत्री अँथनी लोके यांनी केली.या शोधमोहिमेसाठी अमेरिका येथील सागरी रोबोटिक्स कंपनी ओशन इन्फिनिटीबरोबरच्या एका नवीन कराराला मान्यता देण्यात आली आहे. या करारांतर्गत विमानाचा कोणताही महत्त्वाचा अवशेष सापडल्यास कंपनीला ७० दशलक्ष डॉलर्स मिळतील. शोधमोहिमेचा कालावधी जानेवारी ते एप्रिल असेल. ओशन इन्फिनिटीने २०१८ मधील सुधारित तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचा वापर करुन दक्षिण हिंदी महासागरात १५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात विमानाचा शोध घेण्याची योजना आखली आहे.