मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी होऊनही गेले 8 दिवस रखडलेले खातेवाटप अखेर आज जाहीर झाले. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. गृहमंत्रालयासाठी अडून बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे खाते देण्यात आलेले नाही. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले. शिंदे यांना जुनेच नगरविकास खाते देण्यात आले आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत. तर अजित पवार यांनी त्यांना हवी असलेल्या अर्थ खात्यासह राज्य उत्पादन शुल्क हे खाते मिळवले आहे. त्यामुळे अजित पवारांचे मंत्रिमंडळातील वजन वाढले आहे. तर शिंदेंना काहीसा धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर दहा दिवसांनी 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र महायुतीत खात्यांवरून रस्सीखेच असल्याने खातेवाटप झाले नव्हते. त्यामुळे विरोधक सरकारवर दररोज टीका करत होते. हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांनी विनाखात्याचे मंत्री म्हणून काम केले. अखेर आज खातेवाटप झाल्याने या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळाले आहे. या खातेवाटपामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम
मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याव्यतिरिक्त ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण आणि खातेवाटप न झालेली इतर सर्व खाती स्वत:कडे ठेवली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांना जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास), हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कामकाज, गिरीश महाजन यांना जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास) व आपत्ती व्यवस्थापन, गणेश नाईक यांना वने, दादा भुसे यांना शालेय शिक्षण, संजय राठोड – माती व पाणी परीक्षण, धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, जयकुमार रावल यांना विपणन व शिष्टाचार, पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन, अतुल सावे – ओबीसी विकास व दुग्धविकास मंत्रालय व ऊर्जा नूतनीकरण, अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय, शंभूराज देसाई यांना पर्यटन व खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय. आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान, नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध, दत्तात्रय भरणे यांना क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे यांना कृषी, जयकुमार गोरे यांना ग्रामविकास व पंचायत राज, संजय सावकारे यांना वस्त्रे, संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक यांमा वाहतूक, भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन, मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन, नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदरे, आकाश फुंडकर यांना कामगार, बाबासाहेब पाटील यांना सहकार, प्रकाश आबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण ही खाती देण्यात आली आहेत.
मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, गुलाबराव पाटील, अदिती तटकरे यांच्याकडे मागील मंत्रिमंडळात असलेली अनुक्रमे कौशल्य विकास व रोजगार आणि उद्योग व संशोधन, उद्योग व मराठी भाषा, पाणीपुरवठा महिला व बालविकास ही खाती कायम ठेवण्यात आली आहेत.
राज्यमंत्र्यांमध्ये माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण, आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय, मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, इंद्रनील नाईक यांना उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, योगेश कदम यांना ग्रामविकास, पंचायत राज, पंकज भोयर यांना गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.