रशियामध्ये ९/११ सारखा हल्ला युक्रेनने इमारतींवर ड्रोन डागली

मॉस्को – रशियाच्या कझान शहरात युक्रेनने आज सकाळी ८ ड्रोन हल्ले केले. टोलेजंग इमारतीवर धडकणारे ड्रोन आणि धडकेनंतर उडालेला आगिचा भडका हे दृश्य ९-११ च्या अमेरिकेवरील हल्ल्याचे स्मरण करून देणारे होते.युक्रेनच्या या ड्रोन हल्ल्यानंतर कझान विमानतळावरील सर्व उड्डाणे काही काळ थांबविण्यात आली होती. आतापर्यंत या हल्ल्यात कोणी मारले गेल्याचे वृत्त नाही.युक्रेनने केलेल्या आठ ड्रोन हल्ल्यांपैकी ६ हल्ले निवासी इमारतींवर झाले. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये इमारतींवर ड्रोन धडकताना दिसत आहेत.दरम्यान, चार महिन्यांपूर्वी युक्रेनने रशियावर असाच हल्ला केला होता. रशियातील सेराटोव्ह शहरातील व्होल्गा स्काय या ३८ मजली इमारतीला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात चार जण जखमी झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल रशियाने युक्रेनवर १०० क्षेपणास्त्रे आणि १०० ड्रोनच्या साह्याने हल्ला चढवला. त्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.