चेन्नई –
भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ३९ वर्षीय उथप्पावर कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हे वॉरंट क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले असून पुलकेशिनगर पोलिसांना आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रॉबिन उथप्पा ‘सेंचुरीज लाइफस्टाइल ब्रांड प्राइवेट लिमिटेड’ ही कंपनी चालवत होता. या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या खात्यातून पीएफची रक्कम कापली परंतु ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केलीच नाही. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रॉबिन उथप्पावर एकूण २३ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पीएफ आयुक्तसदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी ४ डिसेंबर रोजी एक पत्र पुलकेशिनगर पोलिसांना लिहिले होते. त्यात उथप्पा विरोधात वॉरंट जरी करून त्याला अटक करण्यात यावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार हे वॉरंट बजावले आहे.