नंदुरबार – आपण आतापर्यंत एखाद्या आलिशान वाहनांची किंवा बंगल्यांची किंमत कोटी रुपयांच्या घरात ऐकली असेल. एखाद्या प्राण्यांची किंमत तीही कोटीमध्ये असण्यावर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही.मात्र हे सत्य आहे.
कारण जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त भरलेल्या चेतक फेस्टिव्हलमध्ये तब्बल १९ कोटी रुपये किंमतीचा घोडा दाखल झाला आहे.’बिग जास्पर’ असे या घोड्याचे नाव आहे.
अहिल्यादेवीनगरच्या राजवीर स्टड फार्म सांभाळ करत असलेला हा घोडा यंदाच्या चेतक फेस्टिव्हलमधील सेलिब्रिटी ठरला आहे.बिग जास्परची किंमत तब्बल १९ कोटी रुपये आहे. बिग जास्पर हा ६८ इंचीचा असून महाराष्ट्रातील सर्वात जास्त उंचीचा घोडा असल्याचा दावा त्याच्या मालकांचा आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल आणि संजमसिंग बादल यांच्याकडे सांभाळ झालेल्या बिग जास्परला अहिल्यादवी नगरचे माजी आमदार अरुण जगताप आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप, सचिन जगताप यांनी खरेदी केले आहे.
सध्या त्याची राखण राजवीर स्टड फार्म यांच्याकडून केली जात आहे.बिग जास्परचे वय नऊ वर्ष इतके आहे.बिग जास्परची काळजी घेण्यासाठी पाच जणांचे पथक आहे. आरोग्याच्या तपासणीसाठीचे वैद्यकीय पथक देखील वेगळे आहे. बिग जास्परचा आहार साधा असला तरी त्याला रोज जेवणात करड्याची कुट्टी, चन्याचा खुराक आणि सात लिटर दूध दिले जाते. सारंगखेड्याच्या बाजारात दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे महागडे घोडे विशेष शोसाठी दाखल होतात. मात्र त्यांचे मालक ते घोडे विक्री करत नाहीत.घोड्यांचा चांगला जाणकार आणि ठेवलेली अपेक्षित किंमत मिळाल्यास बिग जास्परची विक्री केली जाईल, असे त्यांचे मालक सांगतात.त्यामुळे या १८ कोटींच्या घोड्याला नेमकी किती बोली लागते, कोण खरेदी करेल, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.