सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण झालीच नाही! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उत्तराने खळबळ

नागपूर – परभणीत 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती. या घटनेनंतर परभणीत हिंसाचार झाला होता. या घटनेत काहींना अटक झाली. अटक झालेला सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. हा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला असा आरोप झाल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. आज याबाबत निवेदन करताना देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्पष्ट केले की, सोमनाथ सूर्यवंशी याला न्यायालयीन कोठडीत कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आली नाही. तो आधीपासून आजारी होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंगावरील जखमा या जुन्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य मात्र सूर्यवंशी याची आई व इतर अनेक संघटनांनी फेटाळून लावले आहे.
विधानसभेत निवेदन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संविधानाची प्रत फाडणारा आरोपी मनोरुग्ण होता. 2012 पासून त्याच्यावर उपचार सुरू होते. तो खरेच मनोरुग्ण आहे का हे तपासण्यासाठी चार डॉक्टरांची नेमणूक केली होती. त्यांनी त्याची तपासणी केली. तो मनोरुग्ण आहे, असा डॉक्टरांनी अहवाल दिला आहे. सकल हिंदू संघटनेच्या सकाळच्या मोर्चात संविधानाबद्दल काही वक्तव्य केल्याने परभणीची घटना घडली असल्याचे म्हटले गेले. पण, सकल हिंदू संघटनेच्या मोर्चात बांगलादेशातील हिंदूंच्या मुद्यांवर भाषणे झाली. तेथे भारतीय संविधानावर कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. यामुळे हिंदू विरुद्ध दलित अशी दंगल नव्हती. मोर्चानंतरचे आंदोलन चालू असतानाच वसंतराव नाईक पुतळ्याजवळ, गंगाखेड रोड या भागात काही आंदोलकांनी पहिल्यांदा टायर जाळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जमावबंदी लागू केली. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत लाठीचार्ज केला. परभणीच्या आंदोलनात तोडफोडीत तब्बल 1 कोटी 89 लाख 54 हजारांचे नुकसान झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी 51 लोकांना ताब्यात घेतले. त्यामध्ये 41 व्यक्तींना तीन गुन्ह्यांत अटक केली. महिलांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांना फक्त नोटीस देऊन सोडून दिले.
फडणवीसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला, याचा तपशील सभागृहात मांडला. ते म्हणाले की, परभणीत जी जाळपोळ सुरू होती, त्या व्हिडीओत सूर्यवंशी दिसत असल्याने त्यांना अटक केली. सोमनाथ सूर्यवंशी यांना दोन वेळा दंडाधिकार्‍यांच्या समोर उभे केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्याला कोणतीही मारहाण झाली नाही असे स्पष्ट सांगितले होते. वास्तविक सूर्यवंशी यांना श्वसनाचा आजार होता. त्यांना दम लागायचा. त्यांच्या शरिरावरील जुन्या जखमांचा देखील उल्लेख शवविच्छेदन अहवालामध्ये आहे. न्यायालयीन कोठडीत असताना सूर्यवंशी याला जळजळ वाटू लागली. त्याच्या कोठडीतील कैद्यांनी ही माहिती दिल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. तरी या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. या घटनेनंतर पोलिसांनी घरोघरी शोध सुरू केल्याचा आरोप केला. मात्र, यामध्ये कुठेही असे घडले नाही. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला का? याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत अशोक घोरबांड यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीसाठी निवेदन देणार आहोत. या प्रकारात मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र काल म्हटले होते की, त्या आरोपीला माथेफिरू कोणी ठरवले? सोमनाथ सूर्यवंशी हा एका जागी बसला असताना त्याला पोलिसांनी घेऊन जाऊन अमानुष मारहाण केली. शवविच्छेदन परभणीत नाही तर संभाजीनगरमध्ये झाले पाहिजे होते. सरकारने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांचा रिपोर्टमध्ये मल्टिपल इन्जुरीचा उल्लेख असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली. तसेच सोमनाथ सूर्यवंशीला कोणी मारले हा प्रश्न उपस्थित होतो. त्यांनी स्वत:ला मारुन घेतले का?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top