सरपंच हत्या प्रकरणातील कराडशी जवळीक! धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाणार?

नागपूर – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणात वाल्मिक कराडला ताबडतोब अटक करा, अशी मागणी भाजपाचे सुरेश धस यांच्यापासून सर्वच जण करत आहेत. वाल्मिक कराड अद्यापही फरार आहे. इतकेच नव्हे तर या हत्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. वाल्मिक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहेत. वाल्मिक कराड याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या कथित संबंधांमुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाणार असे बोलले जात आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यापासून धनंजय मुंडे हे नागपूर अधिवेशनात दिसेनासे झाले आहेत.
आज मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात उत्तर दिले. ते म्हणाले की, देखमुख हत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशीसाठी निवेदन देणार आणि एसआयटी स्थापन केली जाईल. 3 ते 6 महिन्यात आम्ही चौकशी पूर्ण करू. मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून दिली जाणार आहेत. या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना मोक्का लावणार अशी फडणवीसांनी घोषणा केली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधिमंडळात उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, अवादा ग्रीन एनर्जी कंपनीने पवनऊर्जा क्षेत्रात फार मोठी गुंतवणूक केलेली आहे. मात्र काही जण या प्रकल्पाशी संबंधित कामे आम्हालाच द्या, आम्ही सांगतो त्याच दराने द्या, नाहीतर खंडणी द्या अशी मागणी करीत आहेत. 6 डिसेंबर रोजी मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या कार्यालयात बाजूच्या गावातील आरोपी अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले घुसले. त्यांनी वॉचमन अमरदीप सोनावणे आणि सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर थोपटे यांना शिवीगाळ व मारहाण केली. मारहाण झाल्यामुळे थोपटे यांनी सरपंच देशमुखांना फोन केला. बाजूच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच तेथे आले. सरपंचांच्या लोकांनी घुलेंना मारहाण केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख हे आतेभावासह चारचाकी गाडीने गावी परतत असताना टोलनाक्यावर देखमुखांची गाडी अडवली. एका काळ्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांच्या गाडीसमोर आपली गाडी आडवी घातली. देशमुख यांना गाडीतून उतरवून स्कॉर्पिओ गाडीत टाकले आणि त्यांना गाडीतच बेदम मारहाण केली. तारेने त्यांच्यावर वार केले. त्यानंतर गाडीतून उतरवून त्यांना पुन्हा मारहाण केली आणि ते मृत झाले असे समजून हे सर्व लोक त्यांना तिथेच टाकून पळाले. हे सर्व घडत असताना सरपंचांचे भाऊ हे महादेव चाटे यांच्या संपर्कात होते. आम्ही त्यांना सोडतो आहोत असे चाटे सांगत राहिले. प्रत्यक्षात मात्र त्यांची हत्याच करण्यात आली. या मारहाणीत त्यांचे डोळे लायटरने जाळले यात तथ्य नाही. मात्र बेदम मारहाणीमुळे त्यांचे डोळे सुजले होते. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात
आलेली आहे.
या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. वाल्मिक कराड याच्यावर खंडणी मागितल्याचा गुन्हा या घटनेआधी नोव्हेंबर महिन्यात दाखल झाला आहे. या प्रकरणात त्याच्यावर निश्‍चित कारवाई होईल. नोव्हेंबर महिन्यात वाल्मिक कराडने मॅनेजर थोपटे यांना फोन करून प्रकल्प बंद करा, अशी धमकी दिली. त्यानंतर सुदर्शन घुलेने कंपनीत जाऊन थोपटे यांना परळीला कराडने बोलवले आहे असे सांगितले. थोपटे परळीला गेले असता वाल्मिक कराड याने त्यांना काम बंद करा किंवा 2 कोटी रुपये द्या अशी मागणी केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात योग्य ती कारवाई
केली जाईल. मात्र सरपंच देशमुख यांच्या मारहाण प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव अद्याप आलेले नाही. त्याचे नाव आले तर त्याच्यावर निश्‍चितपणे कार्यवाही होईल. त्याचे कुणाशीही संबंध असले तरी त्याच्यावर कारवाई होईल याची ग्वाही देतो. फडणवीस शेवटी म्हणाले की, बीड जिल्ह्यात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरेश धस यांनी याबाबत तक्रार केली आहे. मात्र आता हे प्रकार सहन केले जाणार नाहीत. बीड जिल्ह्यात वाळू माफिया, धमक्या देणे असे प्रकार करणार्‍यांवर कडक कारवाई होईल. या सर्वांची पाळेमुळे शोधून काढून आवश्यक असल्यास त्यांच्यावर मोक्का लावला जाईल. सरपंच हत्या प्रकरणाची चौकशी आयजी लेव्हलच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली नियुक्त समिती करील. देवेंद्र फडणवीस यांच्या या निवेदनाने विरोधक मात्र समाधानी नाहीत. देवेंद्र फडणवीस हे वाल्मिक कराडला वाचवण्याचे प्रयत्न करीत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकणात प्रथमच धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्यांनी देशमुखांची हत्या केली त्यांना फाशी झालीच पाहिजे. पोलीस तपास करीत आहेत. त्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top