नवी दिल्ली – घाबरलेल्या मोदी सरकारने संसदेचे कामकाज स्थगित केले असा हल्लाबोल आज इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांनी निदर्शने केली. यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केले. त्यानंतर देखील विरोधकांकडून आंदोलन सुरूच होते. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या खासदारांकडून विजय चौक ते संसदेपर्यंत निषेध रॅली काढली होती.या रॅलीदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी झाली. यावेळी कॉंग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी खासदारांनी “आय एम आंबेडकर” अशी पोस्टर हातात घेऊन अमित शहा व सरकारविरोधी घोषणाबाजी केली.
काल संसदेच्या मकर द्वाराबाहेर सत्ताधारी व विरोधक यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीत भाजपा खासदार प्रताप सारंगी जखमी झाले होते. त्यामध्ये राहुल गांधी यांनी धक्का दिल्याचा आरोप खासदार सारंगी यांनी केला. या घटनेवरून भाजपाने राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केले. त्यानंतर देखील इंडिया आघाडीने अमित शहा यांनी डॉ आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक भाष्य केल्याचा मुद्दा लावून धरला. मोदी सरकार अदानी व डॉ आंबेडकर मुद्द्यावर चर्चा करण्यास घाबरते. याबद्दलची चर्चा टाळण्यासाठी व जनतेचे लक्ष या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठी धक्काबुक्कीवरून राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करत आहे. असे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी म्हटले. संसद स्थगितीनंतर देखील आम्ही आमचा मुद्दा लावून धरू अशी भूमिका विरोधकांनी घेतली.
याप्रकरणी खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, मोदी सरकार उद्योगपती अदानी या विषयावर चर्चा करायला घाबरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शहा यांनी केलेल्या विधानामुळे त्यांचे खरे मत समोर आले आहे. हा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला, म्हणून त्यांनादेखील सरकार घाबरत आहे. संविधान ही आंबेडकरांनी दिलेली देणगी आहे.इंडिया आघाडी त्यांचा अपमान सहन करणार नाही.
त्या म्हणाल्या की , केंद्र सरकार इतके गोंधळले आहे की त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात खोटे एफ आय आर दाखल केले. मी राहुल गांधी यांना चांगले ओळखते. ते कधीच कोणाला धक्का देवू शकत नाही. देशाला सुद्धा हे माहित आहे. भाजपाने आता डॉ आंबेडकर यांच्या मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी धक्काबुक्कीचा मुद्दा लावून धरत एफआयआर दाखल केले आहे. कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले की,भाजपाने खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत. राहुल गांधी जखमी खासदाराजवळ उभे असल्याचा व्हिडिओ त्यांनी दाखवावा. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि महिला खासदारांना धक्काबुक्की झाली. त्यांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखले जात होते. परंतु काहीही झाले, आमच्यावर लाठीचार्ज झाला तरी आम्ही आंबेडकरांचा अपमान सहन करणार नाही.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले की, भाजपचे हे नियोजित मॉडेल आहे. ते अगोदर असंविधानिक व बेकायदेशीर कामे करतात. विरोध केल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करतात. भाजपाने सभागृहात बाबासाहेबांचा अपमान आहे. बाबासाहेब देशासाठी पूजनीय आहेत .अमित शहा यांनी त्यांचे शब्द मागे घेऊन देशाची माफी मागवी. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, भाजपा व नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात.संसदेतील धक्काबुक्कीचा एकही व्हिडिओ पाहण्यास मिळाला नाही. अमित शहांनी राज्यसभेत जे डॉ आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक विधान केले ते लपवण्यासाठी धक्काबुक्कीची खोटी कथा रचण्यात आली. परंतु देशातील जनता सर्व काही पाहत आहे.भाजपा राहुल गांधींना जेवढे लक्ष्य करील तेवढे ते अधिक मजबूत होतील. देशातील जनता भाजपाचे अहंकारी सरकार उध्वस्त करील.
उबाठाचे आदित्य ठाकरे म्हणाले की,भाजपाने दाखल केलेला राहुल गांधी यांच्या विरोधातील एफआयआर डॉ आंबेडकर यांच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा मार्ग आहे. राहुल गांधी किंवा आम्ही कोणी घाबरलेलो नाही.
तर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली. यामध्ये त्यांनी आरोप केला की, राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेतील भाषणाची क्लिप कापून ती सोशल मीडियावर शेअर केली. अमित शहा यांनी डॉ आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप केला. यामुळे गांधी यांनी आणि जनतेच्या भावना भडकवण्याचा व देश व संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राहुल गांधी यांना निलंबित करावे.
जदयु नेते व केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह म्हणाले, ‘काँग्रेस च्या राज्यात डॉ आंबेडकर यांचा अपमान झाला. राहुल गांधी आता स्वत:ची तुलना आंबेडकरांशी करत आहेत. हा केवळ बालिशपणा आहे. राहुल गांधी यांचा हेतू योग्य असता तर कालची घटना घडली नसती. लोकशाही अशी काम करत नाही. काल जे घडले ते राहुल गांधी यांच्या अपरिपक्वतेचे लक्षण होते.