नवी दिल्ली – काँग्रेसने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान केला आहे. या एक्सपोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विरोधकांकडून होणार्या टीकेला आज लगेच प्रत्युत्तर दिले.
काल गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत म्हटले की, सध्या आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे. एवढे देवाचे नाव घेतले असते, तर सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता. या विधानावरून आज संसदेत व राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला. संसदेच्या बाहेर काँग्रेस खासदारांनी आज आंदोलन केले. हातात बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्विरी घेऊन अमित शहा यांच्या विरूध्द घोषणा देत आंदोलन केले. राज्यात नितीन राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न उपस्थित केला. उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्यावर कारवाईची मागणी केली.
अमित शहा यांच्या विरोधात आज विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यावर पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले की, काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला वाटते की, त्यांच्या दुष्ट अपप्रचाराच्या मागे त्यांनी गेले अनेक वर्षे केलेले गैरप्रकार लपतील. डॉ. आंबेडकरांचा वारसा नष्ट करण्यासाठी आणि अनुसूचित जाती व जमातीना अपमानित करण्यासाठी एका कुटुंबाच्या ताब्यात असणार्या पक्षाने अनेक कुटील युक्त्या केल्या हे भारतातील जनतेने वारंवार पाहिले आहे. काँग्रेसने दोन वेळा आंबेडकर यांचा निवडणुकीत पराभव केला. पंडीत नेहरू यांनी आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार करून त्यांचा पराभव करणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला, त्यांना भारतरत्न नाकारले, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या चित्राला स्थान दिले नाही. डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने या तर्हेने सतत अवमान केला.
त्यांनी पुढे लिहिले की, काँग्रेस त्यांना हवा तेवढा प्रयत्न करू शकते. परंतु अनुसूचित जाती व जमातींविरोधातील भीषण हत्याकांड त्यांच्याच काळात झाले हे ते नाकारू शकत नाही. काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती, पण त्यांनी अनुसूचित जाती जमाती समुदायाच्या विकासासाठी ठोस असे काम केले नाही. संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा अवमान केल्याचा काळा इतिहास उघड केला. अमित शहा यांनी मांडलेल्या तथ्यांमुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळेच त्यांनी ही नाटके सुरू केली आहेत. पण त्यांच्या दुर्दैवाने लोकांना सत्याची पूर्ण कल्पना आहे. पंतप्रधानांच्या ट्वीटनंतरही विरोधक आक्रमकच राहिले. सायंकाळी अमित शहा यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली आणि यात पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला.