मुंबई – ड्युटीवर अधूनमधून डुलक्या काढत झोपणे हे गैरवर्तन असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी हा निर्वाळा देताना ड्युटीवर झोप घेतल्याने कामावरून काढलेल्या कामगाराला थकीत देयकांसह पुन्हा कामावर घेण्याचा कामगार न्यायालयाचा आदेश रद्द केला.
वाकेड येथील असाही कंपनीच्या प्लांटवर वॉचमन म्हणून कार्यरत असलेल्या नदीम डोलारे 27 ऑक्टोबर 2006 रोजी नाईट शिफ्टफदरम्यान तो चेंजिंग रूममध्ये झोपल्याचे आढळून आला. कंपनीने याची गंभीर दखल घेत शिस्तभंगाची कारवाई करून 31 ऑगस्ट 2007 रोजी डोलारेला कामावरून बडतर्फ केले. त्या विरोधात आव्हान दिले. त्यावर कामगार न्यायालयाने शिस्तभंगाची कारवाई व संबंधित चौकशीतील निष्कर्ष अयोग्य ठरवले होते. कामगार न्यायालयाच्या आदेशाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. यावेळी न्यायालयाने कर्तव्य बजावताना झोप काढणे गैरवर्तनच आहे. तथापि, या एका कारणावरून कर्मचार्याला बडतर्फ करणे चुकीचे आहे. त्याला शिक्षा देताना त्या कर्मचार्याच्या सेवेचा मागील रेकॉर्ड विचारात घेणे आवश्यक आहे. आरोपाला पुष्टी देणारे काही पुरावे असतील, तर कामगार आणि औद्योगिक न्यायालय संबंधित कंपनीने केलेल्या अंतर्गत चौकशीतील निष्कर्ष रद्द करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदविले. तसेच झोपाळू कामगाराला पुन्हा कामावर घेण्याचा तसेच थकीत वेतन देण्याचा कामगार न्यायालयाचा आदेश रद्द करून त्याबदल्यात संबंधित कामगाराला 22 लाख रुपयांची एकरकमी भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले.