जालना – विधानसभा निवडणूक होऊन नवे सरकार स्थापन होताच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. 25 जानेवारीपासून ते अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार आहेत. आज त्यांनी ही घोषणा केली. हे आमरण उपोषण फक्त अंतरवली सराटीतच होणार असून, इतर कोणत्याही गावात साखळी उपोषण होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या उपोषणात कदाचित माझा शेवट होऊ शकतो, असे वक्तव्यही त्यांनी केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जरांगेंनी सरकारला यापूर्वी 5 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. आज मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेले नाही म्हणून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 जानेवारीच्या आत सरकारने आमची मागणी करावी. अन्यथा 25 जानेवारीपासून आमरण उपोषण पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. सगेसोयर्यांची अंमलबजावणी तातडीने करावी. सर्व मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. राज्य सरकारने गॅझेटची अंमलबजावणी करावी. सरकारने सांगितल्याप्रमाणे मराठा बांधवांवरील केस मागे घ्यावी, अशा आमच्या मागण्या आहेत. सरकारने स्वत:च्या फायद्यासाठी मराठा समाजाच्या एकजुटीचा फायदा घेतला. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण करावे लागत आहे. ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावे.
कोणीही घरच्यांच्या विरोधात जाऊन उपोषणाला बसू नये. मी एकटा खंबीर आहे. मी कधीही मॅनेज होणार नाही, फुटणार नाही. हे उपोषण मला सहन होत नाही. यात माझा कदाचित शेवटही होऊ शकतो. मला 100 टक्के वाटते की, माझे शरीर साथ देत नाही, कदाचित माझा यात शेवटदेखील होऊ शकतो. नवे सरकार आलेले नाही. जुने होते तेच आता आहे. त्यांना जशी संधी दिली होती तशी आता या नवीन मुख्यमंत्र्यांना पण संधी देऊ, असेही जरांगे म्हणाले.