रत्नागिरी – राजकीय स्वार्थासाठी मंदिरामध्ये जाऊन गाऱ्हाणे घालत देवाला वेठीस धरून राजकीय शपथ घेणाऱ्यांना हातिस येथील गावविकास मंडळाने यांनी इशारा दिला आहे. तुमच्या अडीअडचणी देवासमोर मांडा, त्याला नतमस्तक व्हा; परंतु यापुढे पीर बाबरशेख मंदिरात राजकीय गाऱ्हाणे घालू नका,असे हातिस गावविकास मंडळाने अध्यक्ष दिवाकर नागवेकर यांनी फर्मान काढले आहे.
लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील आघाडीला चांगले मताधिक्य मिळाले होते.मात्र विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य घटले. त्यानंतर कोणी फितुरी केली, असा सवाल करत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवससैनिकांना जाब विचारला होता.काही पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. पक्षाशी कोण एकनिष्ठ राहिले,हे खरे-खोटे करण्यासाठी हातिस पीर बाबरशेख मंदिरात शपथ घेण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेचे शेखर घोसाळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी हातिसला मंदिरात जाऊन शपथ घेतली.हा विषय चांगलाच चर्चेत आला होता.त्यानंतर राजकीय स्वार्थासाठी देवाला वेठीस धरणे योग्य नाही, असे म्हणत हातिस गावविकास मंडळाने याची दखल घेतली आहे.
घोसाळे यांच्या शपथेनंतर मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये अशाप्रकारे राजकीय शपथ घेण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत हातिस गावविकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर म्हणाले की, ग्रामस्थांना उबाठाने गाऱ्हाणे घातल्याचे कळले, तेव्हा तत्काळ गावामध्ये आम्ही बैठक घेतली.यापुढे अशी गाऱ्हाणे किंवा अशा शपथा घेण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.उबाठा गटाच्या शिवसेनेचे शेखर घोसाळे यांना गावात बोलावून घेतले. ग्रामस्थांसमोर त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत ग्रामस्थांचा निर्णय सांगण्यात आला. यापुढे अशा राजकीय शपथा कोणीच घेऊ नयेत, याबाबत कल्पना दिली. यावेळी शेखर घोसाळे यांनीही या घडलेल्या प्रकाराबाबत चूक झाल्याचे मान्य केले.