नवी दिल्ली – अलाहाबाद येथील विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात सहभागी होऊन मुस्लीम समाजाविषयी आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने समन्स बजावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना या संदर्भात पुढच्या आठवड्यात भेटीला बोलावले आहे.
न्यायमूर्ती शेखर यादव यांनी ८ डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात मुस्लीम धर्मीयांविषयी अनेक आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांनी मुस्लीमांचा उल्लेख कटमुल्ला असा केला होता. त्याची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासन विभागाने अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे सविस्तर माहिती मागवली होती. त्यांच्याकडे न्यायदानाची जबाबदारी देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयीन दायित्वे व सुधारणा मंडळाने सरन्यायाधीशांकडे त्यांची विभागीय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर १२ डिसेंबरला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी शेखर यादव यांच्या रोस्टरमध्ये बदल केला होता. त्यांना केवळ २०१० च्या आधी नोंदवण्यात आलेल्या जिल्हा न्यायालयांनी निकाल दिलेल्या प्रकरणांच्या पहिल्याच सुनावणीची जबाबदारी देण्यात आली होती.
याच दरम्यान काॅंग्रेस खासदार कपिल सिब्बल यांनी त्यांच्या विरोधात राज्यसभा सचिवालयाकडे महाभियोगाची नोटीस दिली. त्यावर ५५ राज्यसभा सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ही नोटीस सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे. शेखर यादव यांना पुढच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडावी लागणार आहे. न्यायधीशांनी धर्मनिरपेक्ष वर्तन करावे अशी सर्वसाधारण आचारसंहिता आहे.