कोल्हापूर- फुटबॉल खेळताना दमल्याने धाप लागून अत्यवस्थ झालेला महेश धर्मराज कांबळे (३०) या तरुणाचा मृत्यू झाला. दुपारी कळंबा परिसरातील टर्फ मैदानावर हा प्रकार घडला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.
महेश कांबळे हा एका खासगी बँकेत वसुली प्रतिनिधी म्हणून नोकरी करत होता. काल रविवारची सुट्टी असल्याने तो मित्रांसोबत टर्फ मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. दुपारी खेळत असताना त्याला धाप लागली. दमलेल्या अवस्थेत त्याने मैदानाबाहेर जाऊन पाणी प्यायले. यानंतर काही वेळातच त्याला भोवळ येऊ लागली. यामुळे त्याच्या मित्रांनी कळंबा रिंगरोडवरील दवाखान्यात दाखल नेले. येथे उपचारांनंतर त्याला बरे वाटू लागले. यामुळे महेश घरी गेला. मात्र, काहीवेळाने अचानक त्याला पुन्हा चक्कर येऊन तो अत्यवस्थ बनला. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी वाटेतच त्याचा मृत्यू झाला. महेशच्या मागे पत्नी, मुलगा, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.