सिंधुदुर्ग – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी अनावरण झालेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला होता. या घटनेला चार महिने उलटल्यानंतर राज्य सरकारने या ठिकाणी कास्य धातूपासून ६० फूट उंचीचा नवा पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे.
राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गार्नेट इंटिरियर्स या कंपनीने २०.९० कोटींची तर राम सुतार यांच्या कंपनीने ३६.०५ कोटींची निविदा दाखल केली होती. राम सुतार यांच्या कंपनीने इतर कंपन्यांपेक्षा अधिक दराने बोली लावली होती. पण नंतर वाटाघाटीमध्ये निविदेशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले. पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असणार आहे. तर पुतळ्यासाठी ३ मीटर उंचीचा मजबूत असा चबुतरा बनविण्यात येणार आहे. निविदेनुसार १०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट आहे. कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतली जाईल.