नवी दिल्ली- चलो दिल्ली हे आंदोलन कायमस्वरूपी थांबवून शेतकऱ्यांनी गांधीवादी पद्धतीने आंदोलन करण्याची सूचना आज सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आंदोलकांना केली आहे. आमरण उपोषण करत असलेले शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या प्रकृतीबाबतही न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
शेतकरी आंदोलनावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सरकारने आमरण उपोषण करणाऱ्या डल्लेवाल यांना आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवावी. तसेच आमरण उपोषण मागे घेण्यासाठी त्यांची समजूत घालावी. यावेळी कोणत्याही प्रकारे बळाचा वापर करु नये. शेतकऱ्यांनी गांधींजींच्या मार्गाने आपले म्हणणे मांडावे, त्याचप्रमाणे रोखून धरलेले महामार्ग मोकळे करावेत. सरकारच्या प्रतिनिधींनी तातडीने डल्लेवालांची भेट घ्यावी, असे आवाहनही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केले आहे. डल्लेवाल हे शेतमालाला किमान आधारभूत किमतीच्या मागणीसाठी २६ नोव्हेंबरपासून पंजाब व हरियाणाच्या खनौरी सीमेवर आमरण उपोषण करत आहेत.