पुणे – शहरात ठिकठिकाणी विकासकामे तसेच नवीन बांधकामांमुळे धोकादायक धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे.त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने तीन वर्षांपूर्वी तब्बल १ कोटी २ लाख रुपये खर्च करून घेतलेले तीन ‘फॉगर ट्रक’ गेल्या तीन वर्षापासून विनावापर पडून होते.अखेर हे ट्रक रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.
यासाठीच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सुमारे दोन वर्षे ही वाहने वापरली जाणार आहे. त्यासाठी ८४ लाख ९० हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. शहरातील धुलिकणांचे प्रमाण अधिक असलेले कात्रज- कोंढवा रस्ता, खराडी येथील आयटी पार्क रस्ता तसेच हांडेवाडी ते फुरसुंगी कचरा डेपो समोरील रस्त्यांची स्वच्छता केली जाणार आहे. त्यामध्ये १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंचे पादचारी मार्ग, दुभाजक असे एकूण ४० किलोमीटर अंतरात ही यंत्रणा वापरली जाईल.या वाहनासोबत सात हजार लिटर क्षमतेचा टँकर असून टँकरच्या समोरच्या बाजूस चार ठिकाणावरून फवारणी होईल.त्याचप्रमाणे ट्रकच्या डाव्या आणि उजव्या बाजूने प्रत्येकी दोन आणि गाडीच्या वरच्या बाजूने दोन्ही बाजूस प्रत्येकी चार अशा १६ ठिकाणावरून पाणी फवारणी होईल.या पाण्याच्या फवारणीमुळे हे धुलिकण पाण्यासोबत खाली येतील.