नाशिक – समाधानकारक पडलेल्या पावसामुळे गेल्या आठवड्यात नाशिकातील सर्व धरणांत ६३ हजार ६०० दलघफू म्हणजे ९७ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत या धरणांत यंदा २१ टक्के अधिक जलसाठा असल्यामुळे येत्या काळात नाशिकमधील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यात २०२३ मध्ये कमी पाऊस झाल्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपासून अर्ध्याअधिक तालुक्यांमध्ये टँकरच्या फेर्या सुरू झाल्या होत्या.जूनपर्यंत हे टँकर कायम होते.१ हजारांहून अधिक गावे आणि वाड्यांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात होता.मात्र,यंदा नाशिकात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ६३ हजार ६०० दलघफू पाणीसाठा उपलब्ध आहे.नाशिकची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात ९६.३८ टक्के पाणीसाठा आहे.या धरण समूहातील चारही प्रकल्पात मिळून ९१.७६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.चणकापूर,गिरणा व नांदूरमध्यमेश्वर हे तिन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. तर गौतमी-गोदावरी व पालखेड वगळता अन्य प्रकल्पांत ९० टक्क्यांहून अधिक साठा आहे.