सिद्धिविनायक मंदिर परिसर विकासासाठी वास्तू विशारद सल्लागाराची निवड

मुंबई – प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या परिसराचा विकास आणि आसपासची सुधारणा करण्यासाठी तब्बल ४९३.९२ कोटी रुपयांची तरतूद केली. उपलब्ध निधीतून या परिसराचे सुशोभिकरण करण्याचा आराखडा बनवण्यासाठी महापालिकेच्या वतीने वास्तुशास्त्रज्ञाची निवड केली.

या कामासाठी वास्तूशास्त्रीय सल्लागार सेवेसाठी इंजिनिअस स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या आवश्यकतेनुसार बांधकाम आराखडा बनविणे, व त्यावर मान्यता प्राप्त करणे, महापालिकेतील विविध खात्यांकडून अभिप्राय प्राप्त करणे व आवश्यक त्या सबंधित प्राधिकरणाकडून प्रस्तावास ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे, खात्याच्या मान्यतेकरिता कल्पनात्मक नकाशे बनविणे आदी कामांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास अंदाजे २४ ते २७ महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली.