दहिवडी – माण तालुक्यातील मलवडी येथील श्री खंडोबाची वार्षिक यात्रा सुरू आहे. त्यानिमित्त श्री खंडोबा व माता म्हाळसादेवीचा हळदी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्यासाठी महिलांनी अलोट गर्दी केली होती.
देवदीपावलीच्या शुभमुहूर्तावर रात्री सव्वानऊ वाजता श्री खंडोबा व माता म्हाळसादेवीचा हळदी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यंदा प्रथमच हळदी सोहळ्यापूर्वी घाणा या विधीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रांगोळी व फुलांच्या सहाय्याने घाणा दळण्यासाठी जाते सजविले होते.पान,विडा आणि बांगड्यांची आरास करण्यात आली होती.सुवासिनींनी मोठ्या भक्ति-भावाने घाणा विधी पार पाडला. त्यानंतर सव्वानऊ वाजता ब्राह्मण व जंगम यांनी सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर विश्वस्त,सालकरी, मानकरी, सेवेकरी, भाविक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हळदी सोहळ्यास सुरुवात झाली. या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.महिलांनी हळदी लावल्यानंतर पुरुषांनी हळदी सोहळ्यात सहभाग घेतला.रात्री ११ वाजेपर्यंत हळदीचा कार्यक्रम सुरू होता.सध्या श्री खंडोबाचे नवरात्र सुरू झाले असून यानिमित्त दररोज दुपारी बारा वाजता आरती व त्यानंतर महाप्रसाद वाटप केले जाणार आहे.