सावंतवाडी- बांदा पंचक्रोशीत बीएसएनएलचे दर वाढविले आहेत.त्यातच मोबाईलसाठी तीन टाॅवर उभारले , मात्र ते कार्यरत नाहीत . त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बांदा बीएसएनएल कार्यालयावर धडक मारली. येत्या १५ जानेवारीपर्यंत हे तिन्ही टॉवर सुरू केले नाही तर कार्यालय उघडू न देण्याचा इशारा दिला.
बांदा भाजपचे पदाधिकारी गुरू कल्याणकर,हेमंत दाभोलकर,सागर गावडे,संजय सावंत आणि ग्रामस्थांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी सिंधुदुर्ग उपमहाप्रबंधक आर.व्ही.जानू यांनी १५ जानेवारीपर्यंत तिन्ही टॉवर सुरू करण्याचे आश्वासन दिले.मात्र आश्वासन पूर्ण केले नाही तर बीएसएनएल कार्यालयाच्या दारातच आंदोलन करण्याचा आणि प्रसंगी कार्यालय उघडू न देण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थ आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.असनिये ,डोंगरपाल आणि घारपी याठिकाणी दीड वर्षांपासून केवळ मोबाईल टॉवर उभे केले आहेत.ते सुरू केलेले नाहीत.त्यामुळे मोबाईल ग्राहक हैराण झाले आहेत .