राहुल गांधी देशद्रोही! देश तोडायचा आहे! भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशद्राही आहेत. देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या लोकांशी राहुल गांधी यांचे घनिष्ठ संबंध आहेत,असा गंभीर आरोप आज भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.यावेळी पुराव्यादाखल त्यांनी काही छायाचित्र आणि मीडियामध्ये छापून आलेल्या काही वृत्तांची कात्रणे दाखविली.
ओसीसीआरपी या शोध पत्रकारांच्या जागतिक संघटनेच्या इशाऱ्यावर राहुल गांधी देश तोडण्याचे काम करीत आहेत,असा दावा पात्रा यांनी केला. जगभरातील भ्राष्टाराची प्रकरणे चव्हाट्यावर मांडणाऱ्या ओसीसीआरपीचा कारभार संशयास्पद आहे. या संघटनेला सर्वाधिक निधी ओपन सोसायटी फाऊंडेशन या संस्थेकडून मिळतो. ओपन सोसायटी फाऊंडेशन ही संस्था जॉर्ज सोरोस नावाच्या उद्योजकाच्या मालकीची आहे. देशादेशांमध्ये अस्थिरता माजवणे, आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न करणे, हे काम ओसीसीआरपी करते. राहुल गांधी याच संस्थेचा दुसरा चेहरा आहेत,असा आरोप पात्रा यांनी केला.
त्यांनी याप्रसंगी ओसीसीआरपीने छापलेल्या काही खळबळजनक वृत्तांचे दाखले दिले. सन २०२१ मध्ये जग कोव्हीड-१९ महामारीचा सामना करत होते. त्या कठीण काळात भारताने स्वबळावर कोव्हॅक्सिन ही लस विकसित केल्यानंतर भारताला बदनाम करण्याच्या उद्देशाने ओसीसीआरपीने १ जुलै २०२१ रोजी एक वृत्त प्रसिध्द केले की या लशीसाठी ब्राझीलने भारताला दिलेली ३२४ दशलक्ष डॉलरची ऑर्डर रद्द केली,यामुळे या लशीबद्दल शंका निर्माण झाली. सपशेल खोटा असा दावा त्या वृत्तामध्ये करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी २ जुलै २०२१ मध्ये राहुल गांधी यांनी या वृत्ताचा आधार घेत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्ला चढवला. सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. संसदेत गदारोळ करून कामकाजाचे असंख्य तास वाया घालविले. आंतराराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलिन झाली.राहुल गांधी आणि ओसीसीआरपीने रचलेले ते एक षडयंत्र होते,असे पात्रा म्हणाले.
देशातील बड्या उद्योगपतींवर सातत्याने खोटे आरोप करून त्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न ओसीसीआरपी वेळोवेळी करते. त्याला राहुल गांधींची साथ असते.देशातील शेअर बाजार कोसळावा, देशाची अर्थव्यवस्था डळमळीत व्हावी अशा कुटील हेतूने ओसीसीआरपी जी कारस्थाने करते त्यामध्ये राहुल गांधी सहभागी असतात. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत त्यांच्यासोबत दिसलेले सलील शेट्टी हे सोरोसच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष आहेत.यावरून हे स्पष्ट होते की राहुल गांधी हे देशात राहून देशाच्या शत्रूंना मदत करतात.त्याबदल्यात देशद्रोही शक्ती राहुल गांधी यांना मदत करतात. याचे उदाहरण म्हणजे पेगाससचा अहवाल आहे. या अहवालावरून राहुल गांधी यांनी देशभरात रान उठवले होते.मात्र २६ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेगाससच्या अहवालातील दावे फेटाळून लावले. मात्र तोपर्यंत देशाची बदनामी झाली. नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींची चौकशी सुरू होती तेव्हा ओसीसीआरपीने एक लेख प्रकाशित करून राहुल गांधी यांना राजकीय सुडबद्धीने विनाकारण गोवण्यात आले आहे,असा दावाही केला होता.या साऱ्या घटनांवरून स्पष्ट होते की, राहुल गांधी देशद्रोही आहेत,असे पात्रा म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top