मुंबई – हरिद्वारमध्ये माझे अपहरण करण्यात आले होते.अपहरणकर्त्यांनी माझ्याकडून साडेसात लाख रुपये खंडणी उकळली आणि माझी सुटका केली. हा प्रसिध्दीसाठी केलेला स्टंट नव्हता, असे स्पष्टीकरण स्टँड अप कॉमेडियन सुनील पाल याने दिले. मात्र फक्त ७.५ लाख रुपयांसाठी इतक्या प्रसिद्ध व्यक्तीचे अपहरण केले असेल याबाबतच शंका व्यक्त होत आहे.
२ डिसेंबर रोजी सुनील पाल एका कार्यक्रमासाठी हरिद्वार येथे गेला होता. मात्र अचानक त्याचा फोन लागेनासा झाला. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न करून दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीने सांताक्रूज पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांना तो मेरठमध्ये सापडला .
४ डिसेंबर रोजी तो विमानाने मुंबईत परतला.या सर्व नाट्यमय घडामोडी म्हणजे सुनील पाल याने प्रसिध्दीसाठी केलेला स्टंट आहे,असे बोलले जात होते.त्यावर पाल याने आपल्यासोबत काय घडले याची कहाणी सांगितली. तो म्हणाला की माझे अपहरण करण्याचा कट रचण्यात आला होता.एका व्यक्तीने मला हरिद्वारला एका कार्यक्रमासाठी करारबद्ध केले. विमान प्रवासाची व्यवस्थाही त्यानेच केली होती. मी हरिद्वारला पोहोचलो तेव्हा मला कळून चुकले की माझी फसवणूक झाली आहे. तोंडावर बुरखे घातलेल्या काही इसमांनी माझ्या डोळ्यांना कपडा बांधून अज्ञातस्थळी नेले.त्यांनी माझ्याकडे २० लाख रुपये खंडणीची मागणी केली.अखेर घासाघीस करून त्यांनी साडेसात लाख रुपये खंडणी घेऊन माझी सुटका केली. त्यांनी मला मुंबईला परतण्यासाठी विमान तिकिटाचे २० हजार रुपयेही दिले,असे सुनील पाल याने सांगितले.